नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याला कायदेशीर सहाय्य करण्यासाठी दिल्लीच्या न्यायालयाने आज एका वकिलाची नियुक्ती केली. दिल्ली विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने त्याला उपलब्ध करून दिलेल्या वकिलाची सेवा घेण्यास त्याने नकार दिल्यानंतर त्याच्यासाठी दुसरे वकिल देण्यात आले. चारही दोषींसाठी नव्याने “डेथ वॉरंट’ बजावण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धरमेंदर राणा यांनी सोमवारपर्यंत तहकूब केली.
न्यायालयाच्यावतीने बुधवारी पवन गुप्ता याला वकिल देण्याची तयारी दर्शवली होती आणि कायदेशीर प्रक्रियेला विलंब केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.
दरम्यान त्याला उपलब्ध करून दिलेल्या वकिलांची मदत घेण्यास त्याने नकार दिला असल्याचे तुरुंग प्रशासनाने न्यायालयात सांगितले. पवन गुप्तासाठी आता केवळ दयेच्या याचिकेचाच पर्याय शिल्लक राहिलेला आहे. त्यासाठीच त्याने नवीन वकिलाची मागणी केली आहे. दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ निर्भयाच्या पालकांनी आज न्यायालयाच्या बाहेर निदर्शने केली.
दरम्यान या प्रकरणातील आणखी एक दोषी विनय शर्मा याने दयेची याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. आपली दयायाचिका फेटाळण्याच्या शिफारसीवर दिल्लीचे नायब राज्यपाल आणि गृहमंत्र्यांनी सह्या केल्या नव्हत्या असे सांगत शर्माने दयायाचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र या शिफारसींवर दिल्लीचे नायब राज्यपाल आणि गृहमंत्र्यांच्या सह्या असल्याचे न्या. आर भानूमती, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए एस बोपण्णा यांच्या पीठाने आज नमूद केले.