लाहोर : पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. आपली स्थिती सुधारावी म्हणून पाकिस्तान मदत मागतो आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफ आणि जागतिक बॅंक या दोघांनीही पाकला मदत करण्यापासून हात वर केले आहेत. चीन हा त्यांचा मित्र देश पक्का व्यवहारी आहे. पाकला काही दिले तर त्याच्या मोबदल्यात चीन भरपूर वसुली करतो.
मुळात पाकिस्तानातील अनेक प्रकल्पांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक अडकली आहे. राजकीय अस्थैर्यामुळे आता चीनला त्याच पैशाची चिंता असणार. अशात पाकला ते केवळ मैत्रीपोटी आर्थिक मदत करण्याची शक्यता नाही. सौदी अरब पाकला मदत करतो. पण असे किती काळ चालणार? असे सगळे वातावरण असताना पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या देशाला सल्ला दिला आहे. तो म्हटला तर चमत्कारिक आहे पण त्याहीपेक्षा तो खळबळ अधिक निर्माण करणारा आहे. या सल्ल्यानुसार पाकिस्तान खरेच वागले तर काय हाही मोठा प्रश्नच असणार आहे.
काय आहे सल्ला?
एका प्रख्यात चॅनलच्या संकेतस्थळावर मांडलेल्या बातमीनुसार पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या पाकच्या कुख्यात गुप्तचर संस्थेशी कथित जवळीक असणाऱ्या सल्लागार व्यक्तीचे नाव आहे जैद हमीद. त्यांनी चक्क अणुबॉम्ब विकण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानने पाच जरी बॉम्ब सौदी अरब किंवा तुर्कियेला विकले तरी अब्जावधी डॉलर मिळू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांचा हा सल्ला पाकिस्तान ऐकणार का आणि खरेच अणुबॉम्ब विकणार का? आणि विकलेच तर त्यांना किती पैसे मिळतील याच्याही चर्चा होताना दिसत आहेत. जैद हमीद यांनी स्वत:च याचा खुलासा केला आहे. सरकारला उद्देशून तयार केलेल्या व्हिडिओत हमीद म्हणत आहेत की जर पाच बॉम्ब तुम्ही सौदी अरबला विकले तर तुम्हाला एका तासात 25 अब्ज डॉलर मिळू शकतात. तुर्कियेला जर विकले तर त्यांच्याकडूनही 20 अब्ज डॉलर मिळू शकतील.
एका संकेतस्थळाने ऍटॉमिक सायंटीस्टस्च्या अहवालाचा हवाला देऊन अशी बातमी दिली आहे की, पाकिस्तानजवळ सध्या 165 अणुबॉम्ब आहेत. एका बॉम्बची किंमत जर 5 अब्ज डॉलर लावली तरी 20 बॉम्ब विकून त्यांना 100 अब्ज डॉलर मिळू शकतील. याच हिशेबाने 40 बॉम्ब विकले तर 200 अब्ज डॉलर मिळतील. पाकिस्तानला सध्याच्या आर्थिक दिवाळखोरीतून बाहेर येण्यासाठी एवढ्याच रकमेची गरज आहे. यातील 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम त्यांना इतर देशांची कर्जे फेडण्यासाठी लागणार आहे.
खरेच एवढी किंमत मिळणार का?
जैद हमीद यांचा दावा तज्ज्ञांना चुकीचा वाटतो आहे. त्याकरता दक्षिण कोरिया सरकारच्या एका विश्लेषणाचा आधार घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी रॉयटरनेही याबाबतची बातमी दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार जर उत्तर कोरियाकडे 60 अणुबॉम्ब असतील तर त्याची किंमत 18 ते 53 दशलक्ष डॉलरच्या दरम्यान असेल. काही तज्ज्ञांच्या मते बॉम्बची किंमत आकार, गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर निर्धारित होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या विरोधात बॉम्बचा वापर केला होता. त्याचा झालेला आतापर्यंतचा हा एकमेव वापर. त्यामुळे अन्य देशांच्या बॉम्बची विश्वासार्हता अद्याप पडताळली गेलेली नाही. अमेरिकेकडे विश्वासार्हतेची ते प्रमाणपत्र आहे.
पाकिस्तान विकणार का?
पाकिस्तानला अशी बातम्या पसरवण्याची सवय आहे असे पाकच्या माहितीवर लक्ष असणाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित या खोट्या दाव्यांची चिंता करत नाही असे भारताच्याही एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नियम असे सांगतात की पाकिस्तानसारखा कोणता देश अणुतंत्रज्ञान अन्य देशाला हस्तांतरित करू शकत नाही. पाकिस्तानचेच अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांनी उत्तर कोरियाला हे तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही संपूर्ण जगाने पाकिस्तानची कोंडी केली होती. त्यामुळे पाकिस्तान असे काही करेल असे वाटत नाही.
मग ही चर्चा कशाला?
पाकिस्तानला आर्थिक मदतीची आवश्यकता आहेच. राजकीय स्थैर्य देशात नाही. लोकशाही पुन्हा एकदा संकटात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाकला मदत केली तरी त्याची परतफेड होण्याची सूतराम शक्यता जवळपास दिसत नाही. त्यामुळे हात पोळून घेण्याची कोणाची तयारी नाही.
जागतिक संस्थांनीही हात वर केले असल्यामुळे पाकिस्तान स्वत:च आमच्याकडे हा पर्यायही आहे असे सूचित करू पाहतो आहे का? कारण पाकिस्तानला सल्ला देणारी व्यक्ती पाक लष्कराच्या जवळची मानली जाते हे एक आणि दुसरा भाग म्हणजे त्यांनी सल्ला द्यायचाच होता तर तो गोपनीय स्वरूपात द्यायचा. त्याचा व्हिडिओ करून पाक केवळ आपले उपद्रव मूल्य दाखवून वसुली करण्याचा प्रयत्न करतो आहे का हेही तपासावे लागणार आहे.