मैदानावरील कामगिरीवरच मिळते खेळाडूला ओळख

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरकडून नवोदितांना सल्ला

मुंबई – खेळ कोणताही असो, प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीमुळेच खेळाडूला खरी ओळख मिळते, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नवोदित खेळाडूंना दिला आहे. अनअकादमी या ई-लर्निंग संस्थेचा ब्रॅंड ऍम्बेसिडर झाला त्या कार्यक्रमात सचिन आभासी मुलाखतीत बोलत होता.

आम्ही जेव्हा ड्रेसिंगरुमध्ये येतो किंवा एकत्र असतो, तेव्हा आम्ही कुठून आलो किंवा आपला काय संबंध या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. खेळाच्या मैदानावर तुमच्या कामगिरीशिवाय कशालाही महत्व नसते. लोकांना एकत्र बांधण्याची ताकद खेळात आहे. एक व्यक्‍ती म्हणून तुम्ही तेथे असता. पण, तेथे तुमच्या कामगिरीचे महत्त्व असते. संघासाठी तुम्ही सर्वस्व देणारी व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघितले जात असते, असेही सचिनने सांगितले.

आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या. कुठलीही गोष्ट तुम्हाला सहज मिळत नसते. त्यासाठी तुमचे योगदान महत्त्वाचे असते. अनअकादमी हे असे व्यासपीठ आहे की ज्यामुळे शिक्षण तुमच्या घरी आले आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षण घ्यायला शाळेत जात, किंवा शिक्षक लांबचा प्रवास करून मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळेत येत. मुलांना शिकविण्यासाठी जाणाऱ्या माझ्या वडिलांचा प्रवास मी पाहिला आहे. आता ई-लर्निंगमुळे शिक्षण तुमच्या घरी आले आहे. त्याचा फायदा करुन घ्यायला हवा, असेही सचिनने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.