मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नारायण राणेंनी बैठकीनंतर विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण राणेंना खोचक सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावतच सल्ला देखील दिला आहे. “अजित पवार थापा मारतात – नारायण राणे.. राणेसाहेब, एक आपुलकीचा सल्ला! बाकीच्यांचे ठीक आहे पण अजितदादांचा नाद करू नका”, असे ट्वीटमध्ये वरपे म्हणाले आहेत.
अजित पवार थापा मारतात – नारायण राणे
राणेसाहेब एक आपुलकीचा सल्ला..! बाकीच्यांचे ठीक आहे पण अजितदादांचा नाद करू नका.
अजितदादांचा थापा मारतात की काय करतात ते एकदा देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, पडळकर, वगैरे यांना विचारून घ्या.. @MeNarayanRane— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) November 4, 2022
“अजितदादा थापा मारतात की काय करतात ते एकदा देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, पडळकर वगैरेंना विचारून घ्या”, असा टोलाही वरपे यांनी लगावला आहे. या ट्वीटमध्ये रविकांत वरपेंनी नारायण राणेंना टॅग केले आहे.
शुक्रवारी झालेल्या या बैठकीनंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली होती. “कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही. हे त्यांचे अज्ञान आहे. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का?” असं नारायण राणे यावेळी म्हणाले.