रांची – जगभरात करोनाने हाहाकार माजवलेला आहे. हा धोका अद्याप कायम आहे, त्यामुळे जोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक जाहिराती करणार नाही, असा निर्णय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने घेतला आहे.
सध्या करोनाचा धोका कायम असल्याने परिवाराला जास्तीत जास्त वेळ देता येत असल्याचे समाधान असून फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करण्यातच मला आनंद वाटत आहे. जाहिराती करून विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी देशवासीयांना उद्युक्त करणे मला योग्य वाटत नाही, त्यामुळेच जोपर्यंत करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारत नाही तेपर्यंत कोणत्याही जाहिराती करणार नाही, असे स्पष्ट मत धोनीने व्यक्त केल आहे.
धोनी त्याचा मित्र मिहिर दिवाकर याच्या साथीत आपल्या फार्महाऊसवर शेती करण्यात व्यस्त आहे. यातच मन रमत असल्याने सध्यातरी कोणतेही व्यावसायिक करार करण्याची इच्छा नाही, असेही धोनीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याला आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायचे होते व त्यासाठी तो चेन्नई सुपर किंगच्या सराव सत्रात सहभागीही झाला होता. मात्र, त्यावेळी करोनाचा धोका वाढल्याने सर्व स्पर्धा रद्द झाल्या व सराव शिबिरेही बंद झाल्याने अन्य खेळाडूंप्रमाणे धोनीही घरी परतला.