मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करायला सुरुवात केली. अधिवेशनात तर शिंदे गटातील सर्व आमदारांवर ‘खोके सरकार’ म्हणून जोरदार टीका करण्यात आली. याच टिकेवरून आता मनसेने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे सहकारी अनेकदा शिंदे सरकारचा उल्लेख खोके सरकार असा करतात. सामनामधून तर कित्येकवेळा खोके सरकार असा शब्दप्रयोग करून एकनाथ शिंदेंवर टीका केली जाते. हाच धागा पकडून मनसेने देखील नाव न घेता ठाकरे गटावर टीका केली आहे. सामनाच्या पहिल्या पानावर सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सामनातील ही जाहिरात पोस्ट करत ‘खोके’ सामना मध्ये पोहचले का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरे गटातील नेते वारंवार टीका करताना दिसतात. तसेच हे सरकार लवकरच कोसळेल असा दावाही अनेक नेते करतात. अशात त्याच शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात सामना प्रसिद्ध झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.