संजय पाटोळे यांना हवायं मदतीचा हात
पिंपरी – दृष्टीहीन असलेल्या सांगवी येथील संजय पाटोळे यांना नियतीने संकटांवर संकटे दिली पण त्यांच्यावर मात करण्याची जिद्दही दिली आहे. घरगुती शिकवणी, जेवणाचे डबे तयार करून त्यावर गुजराण करणाऱ्या पाटोळे कुटूंबियांचे दोन्ही व्यवसाय करोनाच्या संकटामुळे सध्या बंद पडले आहेत. घरभाड्यासह वीजबिल थकले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे. मुलाला किंवा पत्नीला नोकरी मिळाल्यास त्यांची ही आर्थिक विवंचना संपणार आहे.
संजय पाटोळे हे वीस वर्षांपूर्वी दृष्टीहीन झाले. त्यानंतर काही क्षणासाठी हतबल झालेल्या संजय यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पत्नीसह घरगुती शिकवणी आणि जेवणाचे डबे तयार करून त्यावर स्वत:चा चरितार्थ सुरू केला. करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे हे दोन्ही व्यवसाय बंद पडले. पर्यायाने, त्यांना उदरनिर्वाहाची व मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक पैशांची चणचण निर्माण झाली.
त्यातच संजय यांना अर्धांगवायू (पॅरालिसिस) झाला. त्यामुळे ते पुरते खंगले. त्यांचा मुलगा ओमकार याला फीटचा त्रास होतो. तसेच, तो बोलताना अडखळतो. सध्या तो पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षाला आहे. दुसऱ्या वर्षात तो डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाला. तृतीय वर्षात त्याला शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज आहे. मात्र, सध्या त्याच्याकडे तो उपलब्ध नसल्याने त्याची गैरसोय होत आहे.
संकटांवर संकटे येत असताना संजय पाटोळे यांनी अद्यापही जिद्द आणि चिकाटी सोडलेली नाही. या परिस्थितीतून मार्ग निघेल, असा त्यांचा विश्वास कायम आहे. पत्नीला किंवा मुलाला नोकरी लागल्यानंतर त्यांची ही आर्थिक ओढाताण संपणार आहे. त्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दातृत्त्वांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी 7058512820 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मनसेकडून मदतीचा हात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांना संजय पाटोळे यांची परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी लगोलग मदतीचे हात पुढे केले. त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीसाठी लागणारे सर्व किराणा साहित्य, आकाशकंदिल, पणत्या तसेच मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी 4 हजार रुपयांची रक्कम दिली आहे.