चेह-याच आरोग्य वाढवणारं जीवनसत्त्व : ब-२

शरीरातील पांढ-या पेशींची संख्या कमी होते

‘ब-२’ या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे चेह-याचं आरोग्य बिघडतं. शरीरातील पांढ-या पेशींची संख्या कमी होते. म्हणूनच तर आहारतज्ज्ञ ‘ब-२’चं प्रमाण असलेल्या पदार्थाचा वापर अन्नात करावा, असं सांगतात. ‘ब-२’ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असलेले हे अन्नघटक आहेत – हिरवे मूग, पांढरे छोले, वाटाणे, लाल हरभरे, शेंगदाणे, काळे राजमा (क्युबन ब्लॅक बीन्स) हे अंकुरित धान्य-कडधान्य.

‘रायबोफ्लॅविन’ हा रासायनिक घटक ‘ब-२’ जीवनसत्त्वाची प्रमुख ओळख आहे. त्याचबरोबरीने ‘जी’ जीवनसत्त्वात ‘ब-२’ जीवनसत्त्वाचे प्रमुख घटक असतात. ‘ब-२’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्वचा लाल होऊन माशांप्रमाणे खवलेदार बनते. तसंच अनेक प्रकारचे त्वचाविकार होतात. ओका-या, हगवण आणि स्नायूत दुखणं हे विकार सुरू होतात. ओठ अवाजवी लाल किंवा गुलाबी दिसू लागतात. नंतर ते सुजत जातात व त्यांना चिरा पडू लागतात. ओठाच्या कडेचा भागही सुजतो व तिथे जखमा होऊ लागतात. जीभ जास्त लाल दिसू लागते.

डोळ्यांचे शुभ्र-पटल व पार-पटल यातील रक्तवाहिन्यांचा रंग दिसू लागल्याने संपूर्ण डोळे लाल दिसतात. डोळ्यांची जळजळही होते. हळूहळू डोळ्यांचं शुभ्र-पटल काळपट दिसू लागतं. डोळ्यांतून सतत पाणी गळतं. ऊन वा उजेडाकडे बघताना डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. मोतीबिंदू वाढतो. त्वचा आक्रसते. पापण्या, नाकाचा भाग इ. ठिकाणी घडया व सुरकुत्या पडू लागतात. तोंड येणं, तोंडात फोड तसंच जखमा होणं हे विकार होतात. हा त्रास दीर्घकाळ राहतो व वाढतही जातो. अस्थिमज्जेवर विकृत परिणाम घडू लागतात, त्यामुळे पांढ-या पेशींची संख्या घटत जाते.
अशा वेळी रायबोफ्लॅविनयुक्त घटकांचे जास्तीत जास्त सेवन करून ‘ब-२’ जीवनसत्त्वाची गरज भागवली जाते.

रायबोफ्लॅविनच्या निर्मितीसाठी यीस्टचा वापर करणं हा सोपा आणि उत्तम मार्ग आहे. प्रत्येक १०० ग्रॅम यीस्टमध्ये ५ मि. ग्रॅ. इतकं रायबोफ्लॅविन असतं तर प्रत्येक निरोगी माणसाला १.८ मि.ग्रॅ. इतकीच रायबोफ्लॅविनची गरज आहे. अर्थातच त्यासाठी ३६ ग्रॅम यीस्ट खाऊ नका. त्यामुळे पोट बिघडेल व गॅसेसचा जबरदस्त त्रास होईल. यीस्ट हे अत्यंत थोडं म्हणजे घरच्या घरी १-२ ग्रॅम इतकंच वापरतात. टोमॅटो तसंच हिरव्या भाज्यांत रायबोफ्लॅविन भरपूर प्रमाणात असतं.

त्यामुळे टोमॅटो, हिरव्या भाज्या आणि हिरवे मूग, पांढरे छोले, वाटाणे, लाल हरभरे, शेंगदाणे, काळे राजमा(क्युबन ब्लॅक बीन्स) हे अंकुरित धान्य-कडधान्य यांचा बराचसा वापर करून ही कमतरता भरून काढता येते. निसर्गोपचारांत धान्याला मोठ-मोठे मोड आणून खाण्यास सांगण्याचे हेच कारण आहे. काही प्रकारची जैविक शेवाळे जसे, एरेमोथेसिअम एसिबी वाढवून मोठय़ा प्रमाणात रायबोफ्लॅविन मिळवता येतं.

जीवनसत्त्व ब-२ च्या कमतरतेमुळे होणारे आजार : पंडुरोग(अ‍ॅनिमिया), पांढ-या पेशींचं प्रमाण कमी होणं.

ब-२ जीवसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पुढील खाद्यपदार्थाचा आहारात उपयोग करावा.
फळं : बदाम, नारळ, शेंगदाणे, काजू, पपई, अननस, केळे, संत्री, सफरचंद, जरदाळू, अ‍ॅवोकॅडो, खजूर, अंजीर, द्राक्षे, पपनस, पीच, पेर, आलुबुखर, प्रून, स्ट्रॉबेरी, कलिंगड, खरबूज, टरबूज, चिबूड, डाळिंब, बेदाणा, अक्रोड

रसाहार, पेय आणि सरबतं : दूध आणि दुधाचे पदार्थ, दही, हिरव्या भाज्या, माठ, नारळ, पालक, शतावरी, ब्रोकोली, गूळ (लाल किंवा काळा पण रसायनविरहित) आणि काकवी.

सूप आणि भाज्या : बीट, छोटी कणसे, ब्रोकोली, बिटाची पाने, अल्फाल्फा, शतावरी, अळंबी, कांदा, पपई, कमलकंद, मुळ्याचा पाला, काळा अळू, घरगुती चीज, नोरीसारख्या सागरी वनस्पती,चवळाई, चंदनबटवा, मेथी, कढीपत्ता, सलाड पाने.

कोशिंबिरी : बीट, गाजर, मुळा, बटाटा, रताळे व त्याची हिरवी पानं, सलाडची हिरवी पानं, ब्रोकोली, काकडी, कोबी, फुलकोबी.
चटण्या व लोणची : मेथी, कढीपत्ता, नारळ, पेरू, मिरी, बटाटा, रताळे आणि जवस तेल.

उकडून, शिजवून, मोड आणून, भाजून किंवा कच्चे खाण्यायोग्य पदार्थ : यीस्ट, बाजरी, तांदूळ, जवसाचं पीठ, रानतांदूळ, घरगुती चीज, ज्वारी, मसूर, पावटा, मटार, सोयाबीन, मोड आणलेले शेंगदाणे, उडीद, मका, नाचणी, बार्ली, ओट्स, आरारुट, वाटाणा, घोळ, घरगुती लोणी, वांगी, फुलकोबी, बीट, कुळीथ, फुटाणे, भातकोंडा,
काळे चणे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.