#भाष्य: ‘जलयुक्‍त’चे अधिक-उणे

डॉ. दत्ता देशकर (भारतीय जलसंस्कृती मंडळ) 
जलयुक्‍त शिवार या योजनेच्या संदर्भात सध्या बऱ्याच उलटसुलट चर्चा चालू आहेत. काही जण झालेल्या लाभांचे कौतुक करताना तर काही जण या यशाबद्दल साशंक आहेत. मीही बऱ्याच तज्ज्ञांशी चर्चा केली. समाजात पाणी चळवळीला प्रोत्साहित करण्यात या योजनेने भरपूर यश मिळविले आहे याबद्दल सर्वाचेच एकमत आहे. पाणी प्रश्‍न हा सरकारचा प्रश्‍न नाही तर तो सर्वांचा प्रश्‍न आहे याची जाणीव या कामामुळे निर्माण झालेली आहे. हा विश्‍वास टिकून राहायचा असेल तर या कामांचा लाभ दीर्घ काळ कसा मिळत राहील याचा विचार होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच्या मतांचा आदर केला जावा हीच अपेक्षा आहे.
आपल्या राज्यात सतत पडत चाललेल्या दुष्काळाला उत्तर हवे होते. त्यावर विचारमंथन होऊन आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जलयुक्त शिवार योजनेला 2016 साली सुरुवात झाली. या योजनेचे बरेच उद्देश सांगण्यात येतात. पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भाच्या पाणी पातळीत वाढ घडवून आणणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे आणि शेतीत स्थैर्य आणण्यसाठी संरक्षित पाणी उपलब्बध करून देणे, राज्यातील सर्वांना पेयजल उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात ज्या योजना बंद पडल्या आहेत त्यांना चालू करण्यासाठी प्रयत्न करणे, विकेंद्रित जलसाठी निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे, लोकसहभागातून जलसाठ्यांतील गाळ काढून त्यांची जलधारणक्षमता वाढविणे, वृक्षलागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्षांची संख्या वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाची संकल्पना गावागावात रुजवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याला प्रोत्साहित करणे इत्यादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार योजना वाटचाल करीत आहे.
या योजनेच्या संदर्भात बऱ्याच उलटसुलट चर्चा चालू आहेत. काही जण झालेल्या लाभांचे कौतुक करताना तर काही जण या यशाबद्दल साशंक आहेत. मीही बऱ्याच तज्ज्ञांशी चर्चा केली. समाजात पाणी चळवळीला प्रोत्साहित करण्यात या योजनेने भरपूर यश मिळविले आहे याबद्दल सर्वाचेच एकमत आहे. समाज इतके दिवस स्वस्थ बसून पाणी प्रश्‍नावर निव्वळ चर्चाच करीत होता पण या योजनेला सुरूवात झाल्यापासून गावागावात जलकार्यकर्ते निर्माण झाले आहेत आणि जलक्षेत्रात कार्य करण्यासाठी उत्साहाने पुढे आले आहेत याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करतात.
पण ज्या पद्धतीने ही योजना राबविली जात आहे त्याबद्दल तज्ज्ञ सामाधानी नाहीत. काहींचे म्हणणे आहे की, माती उकरल्यामुळे ती वाहून जाण्याचीच शक्‍यता जास्त. बरेचदा तर ती जिथून खोदून काढली तिथेच जाऊन स्थिरावते. असे झाले तर खोदकामाचा जो उद्देश होता तोच साध्य झालेला नाही. खोदकाम झालेल्या जागेपासून ती दूरवर नेऊन टाकली तरच ती परत त्या जागी येणार नाही. या मातीवर गवताचे बीज परसविण्यात यावे म्हणजे पावसाळ्यात ते रुजेल आणि त्यामुळे मातीला ते पकडून ठेवेल असे काहींचे म्हणणे आहे.
काहीजण या कामाला शास्त्रीय आधार नाही असे म्हणतात. जोपर्यंत भूगर्भाची रचना अभ्यासली जात नाही तोपर्यंत या कामाचा काही लाभ होणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आजकाल भूजल तज्ज्ञांचे अमाप पीक आले आहे आणि त्यांच्या अर्धवट ज्ञानाने हे काम केले गेले तर त्याचा लाभ मिळू शकत नाही असे ते म्हणतात. यासाठी जलतज्ज्ञ कोण आहेत याची व्याख्या होणे आवश्‍यक आहे. निदान लाभ झाला नाही तर हरकरत नाही पण हानी तरी होऊ नये. जलधरांपर्यंत हे खोदकाम गेल्यामुळे ते उघडे पडतात असे होणे योग्य नाही असे मत ते आग्रहाने मांडतात. केले जाणारे प्रत्येक काम भूजल तज्ज्ञांतर्फे मान्य झाल्याशिवाय असे काम केले जाऊ नये, असा धोक्‍याचा कंदीलही ते दाखवतात. या खोदकामामुळे पावसाचे जमलेले पाणी पाहून डोळे सुखतात पण ते पाणी टिकणार की नाही याचाही विचार झाला पाहिजे. नाहीतर दरवर्षी हेच काम पुन्हा पुन्हा करीत राहणे आपल्या नशिबी आल्याशिवाय राहणार नाही.
आज आपण झोपी गेलेल्या माणसाला जागे करण्यात यशस्वी झालो आहोत. पाणी प्रश्‍न हा सरकारचा प्रश्‍न नाही तर तो तुमचा आमचा प्रश्‍न आहे याची जाणीव या कामामुळे निर्माण झालेली आहे. हा विश्‍वास टिकून राहायचा असेल तर या कामांचा लाभ दीर्घ काळ कसा मिळत राहील याचा विचार होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच्या मतांचा आदर केला जावा हीच अपेक्षा आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)