इंग्लंडमध्ये खेळल्याच्या अनुभवाचा फायदा – ऋषभ पंत

नॉटिंगहॅम – नवोदित यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी कामगिरी करताना भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ऋषभ पंतने आपल्या या कामगिरीचे श्रेय कसोटी मालिकेपूर्वी भारत अ संघाने इंग्लंडमध्ये केलेल्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यातील अनुभवाला दिले आहे.

इंग्लंडमध्ये यष्टीरक्षण करणे हे नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण असते, कारण यष्टीच्या मागे चेंडू मोठ्या प्रमाणावर स्विंग होतो. पण मी इंग्लंड दौऱ्यावर गेले अडीच महिने “भारत अ’ संघाकडून क्रिकेट खेळत असल्यामुळे मला ही संधी मिळाली. तसेच माझ्यासाठी कसोटी पदार्पण सोपे ठरले, असे सांगून ऋषभ म्हणाला की, सध्या मी यष्टीरक्षणाचा कसून सराव करत आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत मला यष्टीरक्षण सोपे जाईल अशी अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऋषभ पंतने भारत अ संघातर्फे इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडीज अ संघांविरुद्ध दौरा केला होता. त्यासाठी तो तब्बल अडीच महिने इंग्लंडमध्ये होता. त्याचा त्याला आता भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना फायदा होतो आहे. दरम्यान त्याने आपल्या पदार्पणातच आपली पहिली धाव ही षटकाराने वसूल केली. तसेच त्याने पहिल्या डावात यष्टीमागे पाच फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात दोन झेल घेत आपली उपयुक्‍तता दाखवून दिली. त्यामुळे त्याला भारतीय संघाचा नवा महेंद्रसिंग धोनी म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.

आपल्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झालेल्या चुकांबद्दल बोलताना ऋषभने सांगितले की, यष्टीरक्षण करताना बहुतेक वेळा गोलंदाजांच्या शैलीवर यष्टीरक्षकाची प्रतिक्रिया अवलंबून असते आणि बुमराहच्या गोलंदाजीची शैली वेगळ्या प्रकारची असल्याने यष्टीरक्षण करताना थोडे अवघड जाते. त्या दिवशी मी त्याच्या गोलंदाजीवर जरा लवकरच हालचाल केली आणि बटलरचा झेल सुटला. एक यष्टीरक्षक म्हणून तुम्ही फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागून तुमच्याकडे येण्याची वाट पाहू शकता आणि त्या सुटलेल्या झेलातून मी हेच शिकलो की, मला वाट पाहावी लागणार आहे आणि प्रतिक्रिया देण्याची घाई करण्याची गरज नाही.

बटलरचा झेल सोपा होता की अवघड यात मला पडायचे नाही, परंतु मला प्रतिक्रिया देण्यात आलेल्या अडचणींमुळे तो झेल सुटला. मी सध्या या समस्येला कशा प्रकारे तोंड देता येईल याचा विचार करत असून माझ्या यष्टीरक्षणाच्या सरावात मी या सर्व अडचणींवर मात करण्याच्या प्रयत्नात आहे, असे सांगून ऋषभ म्हणाला की, माझ्या यशस्वी पदार्पणाचे श्रेय भारत अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माझे वैयक्‍तिक प्रशिक्षक तारक सिन्हा यांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ही कामगिरी करणे अवघड होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)