करोनावरील औषध संशोधनाची प्रगती

करोना आटोक्‍यात येणे शक्‍य नाही, आता करोनासह जगायला शिका, अशी वाक्‍ये अलीकडच्या काळात आपण वारंवार ऐकू लागलो आहोत. एड्‌सला जशी अजून लस किंवा औषध सापडले नाही तसे करोनावर पण औषध निघणार नाही, असाही निराशेचा सूर आपण मधल्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांकडून ऐकला. पण दुसरीकडे त्याचवेळेला जगभरातील शेकडो प्रयोगशाळांमधून करोनावर लस किंवा औषध शोधण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. करोनावर लस शोधल्याशिवाय या रोगाचे अस्तित्व आटोक्‍यात येणे अशक्‍य असल्याने अनेक देशांनी या संशोधनाला प्रोत्साहन दिले आहे.

या संशोधनातून आता हळूहळू विधायक निकर्ष यायला लागले असून अमेरिकेतील मॉडेर्ना नावाच्या कंपनीने ही लस विकसित केल्याचा दावा केला आहे. त्याचा अमेरिकेतील व्यक्‍तींवर प्रत्यक्ष वापर करण्याचीही प्रक्रिया आता सुरू केली जाणार असल्याची दिलासाजनक बातमी आजच प्रकाशित झाली आहे. या कंपनीने आठ मनुष्यांवर प्रत्यक्ष या लसीचा वापर करून त्याचे रिझल्ट तपासले ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचा दावा या बातमीत केला गेला आहे. प्रयोगशाळेत मार्च महिन्यात या कंपनीने मानवी पेशींवर या लसीचा वापर करून पाहिला. त्यात या लसीने करोना विषाणूंची अनेक पटींनी होणारी वाढ पूर्ण थांबवली असल्याचे निष्कर्ष निघाल्यानंतर प्रयोगादाखल प्रत्यक्ष आठ व्यक्‍तींवर या औषधांचा वापर केला गेला.

त्याचेही समाधानकारक निष्कर्ष आल्यानंतर आता या कंपनीने दुसऱ्या टप्प्यात सहाशे सुदृढ व्यक्‍तींवर या लसीचा उपयोग करण्याचे ठरवले आहे. तिसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होणार असून त्यात हजारो लोकांना ही लस देण्याचा प्रयोग केला जाणार आहे. ही एक लस आहे, म्हणजेच करोनाची लागण होऊ नये म्हणून दिले जाणारे औषध आहे. करोना झालेल्यांसाठीचे हे औषध नाही. ते औषध अजून शोधाच्या टप्प्यातच आहे. पण निदान निरोगी सुदृढ माणसांना करोनापासून वाचवण्यासाठीची जरी लस तयार झाली तरी त्याचेही खूप मोठे महत्त्व आहे. जगातील हजारो लोकांना त्यामुळे करोनाग्रस्त होण्यापासून आता वाचवले जाऊ शकते. अमेरिकेतील लोकांवरच या लसीचा वापर करण्यास अनुमती मिळाली असल्याने मॉडेर्ना कंपनीच्या दाव्यात बऱ्यापैकी तथ्य असले पाहिजे असे मानता येते.

त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर हायसे वाटल्याखेरीज राहणार नाही. मार्च महिन्यापासून करोनाची जगभरातील धग प्रचंड प्रमाणात वाढल्यानंतर यावर औषध आणि लस शोधण्यासाठी सर्वांचीच धावाधाव सुरू झाली. पण तोपर्यंत या विषाणूंचा नीट अभ्यास झाला नव्हता. हा विषाणू म्हणे त्याला पायबंद घालण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या अनुरूप तो स्वतःचे स्वरूप बदलतो असा एक निष्कर्ष मध्यंतरी निघाला होता. त्यामुळे त्यावरील औषध शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची भीती सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. करोनाचा विषाणू हा अकरा प्रकारचा आहे असा निष्कर्ष गुजरातमधील काही डॉक्‍टरांनी मांडला होता. त्यामुळे कोणाला नेमक्‍या कोणत्या करोना विषाणूची बाधा झाली आहे, हे शोधून काढणे महाकठीण काम बनले होते. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर करोनावर लस आणि औषधे शोधण्याचे काम संबंधितांनी सुरूच ठेवले आहे.

दिल्ली आयआयटीतील बायोकेमिकल अभियांत्रिकीचे प्रा. डी. सुंदर यांनी भारतातील अश्‍वगंधा ही वनस्पती करोनावर मात करू शकते, असे संशोधन केले आहे. त्यांचा या विषयीचा शोधनिबंध “इंटरनॅशनल रिसर्च जनरल ऑफ बायोमॉलिक्‍युलर डायनामिक्‍स’मध्ये प्रकाशित करण्यास अनुमती मिळाली आहे. त्यानंतर अश्‍वगंधापासून तयार झालेल्या औषधाच्या क्‍लिनिकल ट्रायल्स सुरू होतील. प्रा. डी. सुंदर हे गेली पंधरा वर्षे जपानच्या एका संस्थेसमवेत अश्‍वगंधावर संशोधन करीत आहेत. त्यामुळे त्यांना या औषधी वनस्पतीचे नैसर्गिक गुण अवगत आहेत. त्यांचाही दावा खरा ठरो आणि करोनावर मात करण्यासाठीचे आणखी एक आयुर्वेदिक औषध जगाला मिळो अशीच आशा आपण बाळगली पाहिजे.

लसीसाठी पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटही ख्यातनाम आहे. त्यांनी तर करोनावर मात करणाऱ्या लसीचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू केल्याची बातमी मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांकडे आपली ही लस तपासणीसाठी पाठवली असून त्याची मान्यता ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत येईल अशी सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांना खात्री आहे. त्यांचा या लसीबद्दलचा विश्‍वास इतका दुर्दम्य आहे की ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत लसीला मान्यता मिळून त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन करण्यास विलंब होईल म्हणून त्यांनी ही मान्यता येण्याच्या आधीपासून त्याचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू केले असल्याचे सीरम संस्थेच्या प्रमुखांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. यासाठी साडेसहाशे कोटींची यंत्रणाही आपल्या प्रकल्पात बसवण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते. या साऱ्या दिलासाजनक बातम्या आहेत. त्याची खात्रीशीरता लवकर स्पष्ट होईलच पण या साऱ्या भानगडीत जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे.

विविध संशोधन संस्था आणि कंपन्यांनी करोनावर शोधलेल्या औषधांची परिणामकारकता तपासणे आणि त्या औषधांना मान्यता देणे हे महत्त्वाचे काम ही संघटना करीत असते; पण ही संघटनाच आज ऐन संकटाच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेरिका आणि चीन यांच्या भांडणातून ही जागतिक महत्त्वाची आरोग्य संघटना मधल्यामध्ये चांगलीच भरडली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा प्रमुखच चीनच्या दबावाखाली काम करतो आहे आणि या संघटनेनेच करोनावर औषध शोधण्याच्या प्रक्रियेत किंवा एकूणच करोना प्रसाराच्या प्रकरणातील त्रुटी शोधण्याच्या कामात चालढकल चालवली असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

त्यामुळे अमेरिकेने आता या संघटनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे कामकाजच ठप्प होण्याचा धोका आहे आणि हे कामकाज ठप्प झाले तर करोनावर नव्याने संशोधन करून बाजारात येणाऱ्या लसी आणि औषधांना मान्यता कोण देणार हा प्रश्‍न जगापुढे उभा राहील. करोनावरून अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू झालेले भांडण या औषध निर्मितीतही अप्रत्यक्षपणे अडसर ठरत आहे.

मानवता, जगापुढील आव्हाने वगैरे बाबी या दोन देशांसाठी अंधश्रद्धेसारख्या असतात, हे दोन देश असल्या तत्त्वांना धरून कधीच गंभीरपणे वागत असल्याचे दिसत नाही, कारण त्यांना त्यांच्या स्वार्थाखेरीज काहीही दिसत नाही. अशा प्रसंगी अन्य देशांनी आता जागतिक आरोग्य संघटनेसारख्या महत्त्वाच्या संस्थांना बळ देण्याची गरज आहे. करोनावरील औषधांची व लसीची तातडीची गरज लक्षात घेऊन युरोपातील श्रीमंत देशांनी आता पुढे येऊन आपली भूमिका निभावणे ही काळाची गरज आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.