नवी दिल्ली – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या औषधाच्या उत्पादनासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटची ऍस्ट्र झेनेकाबरोबर भागीदारी केली आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी सीरम इन्स्टिट्युटने “ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडे परवानगी मागितली आहे. सीरम इन्स्टिट्युटने “कोविडशील्ड’या औषधाच्या चाचणीसाठी “डीसीजीआय’कडे शुक्रवारी अर्ज केला आहे.
या अर्जानुसार औषधाची सुरक्षितता आणि रोगप्रतिकार शक्ती तपासण्यासाठी स्वैर आणि निरीक्षक म्हणून 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सुमारे 1,600 उमेदवारांवर चाचण्या केल्या जाणार आहेत.
ब्रिटनमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्शांनुसार ही लस सुरक्षित आणि स्त्री-पुरुष दोघांमध्ये प्रतिक्रियात्मक ऍन्टीबॉडी अधिक वेगाने उत्पन्न करणाऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
सीरम इन्स्टिट्युटने जेनर इन्स्टिट्युट (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी)च्या संभाव्य लसीच्या उत्पादनासाठी ऍस्ट्र झेनेका या ब्रिटीश स्वीडन औषध कंपनीबरोबर करार केला आहे. या लसीचे 1 अब्ज डोस तयार करून वितरीत करण्यासाठी हा भागीदारी करार केला गेल्याचे सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी सांगितले आहे.
ही लस भारत आणि जगातील मध्यम व निम्न उत्पन्न असलेल्या देशांसाठी असणार आहे. भारतात ऑगस्टमध्ये 2 आणि 3 टप्प्यासाठीच्या मानवी चाचण्या सुरू करण्याची सीरम इन्स्टिट्युटची योजना आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सोमवारी लसीची प्रगती समाधानकारक असल्याचे जाहीर केले आहे. जगात अन्य अन्य डझनभर लसींच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. त्यात ही लसीची विशेष प्रगती असल्याचे ऑक्सफर्डने म्हटले आहे.