वाई : येथील अॅड. योगेश संपत जमदाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी महिला पोलीस शिपाई आणि तिला मदत करण्याच्या हेतूने महिला ठाणे अंमलदाराने कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून, त्यांच्या विरोधात वाई वकील संघाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, वाई पोलीस ठाण्याच्या गेटलगत दुचाकी काढण्याच्या कारणावरून पोलीस शिपाई ऐश्वर्या दत्तात्रय बाचल यांनी वाई वकील संघाचे सदस्य अॅड. योगेश जमदाडे (रा. वाई) यांना शुक्रवारी (दि. 12) मारहाण केली होती. त्याबाबत अॅड. जमदाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, ठाणे अंमलदार सौ. शमशाद मुजावर यांनी त्यांना चुकीची वागणूक दिली.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रार न नोंदवता चुकीच्या पद्धतीने तक्रार नोंदवून घेतली. सौ. मुजावर यांनी अॅड. जमदाडे यांना पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. अॅड. जमदाडे यांच्या तक्रारीतील मजकूर पाहता, संशयित महिला पोलिसाचे नाव नमूद केले नाही. या घटनेमुळे वकिलांवर अन्याय झाला असून, वकील वर्गाच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.
अॅड. जमदाडे यांनी तक्रार करूनही, ऐश्वर्या बाचल व सौ. मुजावर यांच्यावर कारवाई झालेली नाही. या अदखलपात्र प्रकरणाबाबत तपास करून, ऐश्वर्या बाचल यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश व्हावेत. सौ. मुजावर यांची चौकशी करून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भोसले, उपाध्यक्ष अॅड. भारती कोरवार, अॅड. उमेश सणस, अॅड. श्रीनिवास कुलकर्णी, अॅड. दिनेश धुमाळ, अॅड. संजय खडसरे, अॅड. प्रशांत खरे, अॅड. महेश शिंदे, अॅड. आर. आर. यादव, अॅड. राजीव मुळे, अॅड. साहेबराव बामणे, अॅड. रफीक शेख, अॅड. जगदीश पाटणे, अॅड. अक्षय भाडळकर, अॅड. चारुशीला गिमवेकर, अॅड. विठ्ठल कदम, अॅड. अविनाश गजरे, अॅड. हृषीकेश कुंभार, अॅड. गणेश मोरे, अॅड. स्मिता जाधव, अॅड. उर्मिला पाटील, अॅड. हृषीकेश सकुंडे, अॅड. गणेश इथापे, अॅड. स्वप्निल आवळे, अॅड. सागर गाढवे व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.