पुणे – भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी भांडाफोड केला. वडगावशेरी येथील दोन गोडावून वर गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करून शनिवारी छापा टाकला आणि तब्बल साडेसातशे लिटर भेसळयुक्त तूप, कच्चामाल आणि साधनसामग्री असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोहील मेहंदी भानोडिया व दिनेश मेहंदी भानोडिया (दोघे रा. मुळ उत्तर प्रदेश) या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वडगावशेरी परिसरात भेसळयुक्त तूप तयार केले जात आहे. तसेच सोहील मेहंदी भानोडिया व दिनेश मेहंदी भानोडिया हे दोन्ही भाऊ मिळून वेगवेगळ्या ठिकाणी भेसळयुक्त तूप तयार करून विक्री करीत आहेत, अशी माहिती बातमीदारकडून गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अंमलीपदार्थ विरोधी पथक (पश्चिम)चे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक कर्मचारी मनोज शिंदे, महेश कदम, फिरोज बागवान, मंगेश पवार, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाने, साहिल शेख, प्रदीप गाडे, रुपाली कर्णवर यांचे पथक आणि एफडीएचे अधिकारी यांनी चंदननगर व येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच कपिलनगर पाण्याच्या टाकीमागे वडगावशेरी येथील गोडाऊनवर छापा टाकला.
वडगावशेरी येथील गोडाऊनमध्ये भेसळयुक्त 750 लिटर तूप, इतर साधन सामग्री व कच्चामाल असा मिळून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघे आरोपी मागील एक वर्षापासून तुपाचे उत्पादन करीत होते. त्यांच्याकडे एफडीएचा कोणताही परवाना नाही. तसेच, सदर गोडाऊनमध्ये अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. पुढील कारवाई अन्न व पुरवठा अधिकारी करीत आहेत.