आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेवरील खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याजवळ रविवारी पहाटे दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस व आयआरबी कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गावर कोसळलेली दरड बाजूला केली. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू केली. दरड हटविण्याच्या कामादरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान वाहतूक जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून लोणावळा खंडाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. लोणावळा शहरात शनिवारी (दि. 6) सकाळी सात वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत तब्बल 173 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

एकीकडे लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे या पावसामुळे “ओव्हर फ्लो’ झालेले भुशी धरण तसेच फेसळत वाहणारे धबधबे यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.