पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बंद पडणाऱ्या बसेसवर उपाययोजना करण्यासाठी आगामी काळात प्रशासनाकडून दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे बसच्या देखभाल दुरुस्तीची माहिती एकाच कर्मचाऱ्याकडे राहणार असल्याने बसेसच्या तांत्रिक समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजारपेक्षा अधिक बसेस असून, यामध्ये डिझेल, सीएनजी आणि ई-बसचा समावेश आहे. या योजनेंतर्गत वर्कशॉपमधील ठराविक बसेस एकाच वर्कशॉपमधील एकाच कर्मचाऱ्यांकडून दुरुस्त करून घेण्यात येणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील अनेक गाड्यांचे आयुर्मान पाच ते सहा वर्षांपेक्षा अधिक आहे. यामुळे मार्गावर सातत्याने बंद पडणे, ब्रेकडाऊनसारख्या घटना घडतात. गाडी मार्गावर बंद पडल्यास जवळील डेपोत दुरुस्तीसाठी नेली जाते. सध्या वर्कशॉपमध्ये उपस्थित असणारे कर्मचारी देखभाल दुरुस्ती करतात. मात्र, तात्पुरत्या उपाययोजनांनंतर पुन्हा त्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात.
याच पार्श्वभूमीवर येत्या काळात प्रत्येक डेपोतील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना काही ठराविक गाड्या दत्तक दिल्या जाणार आहेत. यामुळे गाडीची पूर्ण माहिती होऊन गाडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे शक्य होणार असून, बसेसची योग्य देखभाल दुरुस्ती होईल, असे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.