राज्यात सत्तास्थापनेसाठी “श्रीगोंदा पॅटर्न’चा अवलंब!

“मोठ्या’ला बाजूला ठेवण्यासाठी “छोटे’ एकत्र
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा  – प्रमुख दावेदार बाजूला ठेवण्यासाठी इतर लहान-मोठ्यांनी एकत्र येण्याचा राजकारणातील “श्रीगोंदा पॅटर्न’ अनेक ठिकाणी यशस्वी झाला. आता हाच “श्रीगोंदा पॅटर्न’ राज्याच्या सत्तासमीकरणात राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी, विधानसभा निवडणुकीत राज्यातील सगळ्यांत मोठा पक्ष ठरूनही राजकारणाच्या “श्रीगोंदा पॅटर्न’मुळे भाजप सत्तेपासून दूर राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

श्रीगोंद्यात 1980 साली माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मतविभाजनामुळे पहिल्यांदा आमदार झाले. पुढे बहुतांश निवडणुकांमध्ये तिरंगी लढती झाल्याने मतविभाजनाचा फायदा पाचपुतेंना झाला. त्यांनी निवडणुका जिंकल्या. कॉंग्रेस सरकारच्या काळात पाचपुते राष्ट्रवादीकडून बारा वर्षे मंत्री राहिले. मात्र 2014 साली केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पाचपुते भाजपमध्ये दाखल झाले. पाचपुतेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेत तालुक्‍यातील सर्व पाचपुते विरोधकांना एकत्र करून एकास एक उमेदवार दिला. या निवडणुकीत एकास एक लढत झाल्याने राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने पाचपुतेंचा पराभव केला.

प्रमुख दावेदार बाजूला ठेवण्यासाठी इतर एकत्र येण्याचा राजकारणाचा “श्रीगोंदा पॅटर्न’ राज्यात प्रसिद्ध झाला, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अकोले येथील तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याठिकाणी देखील पिचड यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा “श्रीगोंदा पॅटर्न’ राबवण्याचा जाहीर उल्लेख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला होता. अकोले येथे देखील “श्रीगोंदा पॅटर्न’ यशस्वी होऊन आमदार पिचड यांचा पराभव झाला.

प्रमुख दावेदार बाजूला ठेवण्यासाठी इतरांनी एकत्र येत येण्याचा राजकारणाचा “श्रीगोंदा पॅटर्न’ 2014 साली श्रीगोंद्यात, तर यावेळी अकोल्यासह अन्य ठिकाणी यशस्वी झाला. राज्यात सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाल्याने आता हाच “श्रीगोंदा पॅटर्न’ राज्यात राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यांत मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे या निवडणुकीत तुलनेने छोटे ठरलेले पक्ष एकत्र येत आहेत. राज्याच्या राजकारणात हा प्रयोग यशस्वी झाल्यास इथून मागे मतदारसंघापुरता मर्यादीत ठिकाणी राबवला जाणारा “श्रीगोंदा पॅटर्न’ आता राज्याच्या सत्तास्थापनेत देखील राबवला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.