करोना रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करा

महसूलमंत्री थोरात ः प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक
संगमनेर (प्रतिनिधी) –
करोना हे मानवजातीवरील संकट आहे.करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबरोबर स्वयंशिस्त पाळावी. जे नागरिक नियम पाळत नाहीत, त्यांना प्रशासनाने नियम पाळण्यास भाग पाडावे. करोना रोखण्यासाठी संगमनेरमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब सुरू करावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.
कारखाना कार्यस्थळावर करोना उपाययोजनांबाबत महसूलमंत्री थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्षल तांबे, डॉ. सचिन बांगर, सुरेश शिंदे, पो. नि. अभय परमार, डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदिप कचोरिया आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, करोना हा अदृश्‍य शत्रू आहे. मागील तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसांनंतर राज्यात मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी ही पूर्णपणे मोकळीक नाही हे लक्षात घ्यावे. करोनाचे संकट अद्याप संपलेले नसून, तो काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांबरोबर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याची सवय लावावी. तसेच संगमनेरमध्ये टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून, थ्री टी फॉर्म्युल्यानुसार ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना ही प्रशासनाला दिल्या. तसेच या संकटात कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करताना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.