प्रा. डी. के. वैद्य
अकोले – एकीकडे पुत्रप्राप्तीसाठी भ्रूणहत्या केली जाते, तर दुसरीकडे आपत्य लिंग तपासणी न करता देवाने दिलं आणि पदरात पडलं या नात्याने आतापर्यंत वाटचाल करणाऱ्या आदिवासी ठाकर कुटुंबात अलीकडे मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यावर्षी दोन दिवसांपूर्वी हा प्रकार म्हाळादेवी (ता. अकोले) येथे घडला, तर गतवर्षी पिंपळगाव नाकविंदा येथे हा प्रकार घडला होता.
अकोले तालुक्यात हजारी स्त्रियांचे प्रमाण 996 आहे. त्यात अलीकडे वाढ झालेली असून, आदिवासी भागामध्ये कोणत्याही प्रकारे लिंग चिकित्सा केली जात नाही आणि त्यामुळे सरासरी स्त्री-पुरुष प्रमाण हे जवळपास समसमान पातळीवर पोहोचले आहे. मुलगी दत्तक घेण्याचे नवीन एक धोरण जाणीवपूर्वक आदिवासी ठाकर समाजामध्ये होत असल्याचे सध्या दिसून येते. दोन दिवसांपूर्वी मुलगी दत्तक देण्याचा आणि शिवाय तिच्या वाढदिवशीच हा उपक्रम अवलंबून एका ठाकर समाजातील एका गृहस्थाने हा उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा जगाच्या पुढे आणला आहे. ठाकर समाज हा अल्पशिक्षित आहे. पण प्रामाणिक, स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय काटेकोर.
या समाजातील विजय दीपक डोके (रा. विठे) यांना तीन मुली आहेत. त्यांच्या सुप्रिया नावाच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. सुप्रियाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे वाळीबा गोविंद उघडे (रा. म्हाळादेवी) यांनी ठरविले. सुप्रियाच्या वाढदिवशी तिला आपल्या घरी आणून दत्तक घेतले. विशेष म्हणजे उघडे यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांनी आपल्या या नव्या बहिणीचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले.
उपक्रमाच्या वेळी अकोले तालुका पंचायत समितीचे उपसभापती व उघडे कुटुंबीयांचे जावई असणारे मारुती मेंगाळ याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. शिवाय अकोले तालुका अमृतसागर दूध प्रक्रिया व व्यावसायिक संघाचे संचालक अरुण गायकर हेही या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिले. विशेष बाब म्हणजे अरुण गायकर यांनाही मुलगी नाही. त्यांनी सुप्रियाचा दहावी पर्यंतचा सर्व शिक्षण खर्च आपण करू, अशी यावेळेस घोषणा केली.
मागच्या वर्षीही पिंपळगाव नाकविंदा या ठिकाणचा वाळीबा मेंगाळ यांना दोन मुले. त्यांचे वय वर्षे अठरा-वीस. त्यांना मुलगी नव्हती. त्यांनी आपले चुलत भाऊ शांताराम यांची एक मुलगी दत्तक घेतली. तिही येथे आनंदाने नांदते आहे.एकीकडे स्त्री भ्रूणहत्या होत असताना ठाकर समाजाने दाखवलेला मार्ग बहुजन व सुशिक्षित समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या प्रकारातून मुलगी आपण चांगल्या प्रकारे जोपासू शकतो. आपली परिस्थिती त्या आड येत नाही, हेच या प्रकाराने अधोरेखित केले.