पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाची प्रवेशप्रक्रिया लवकरच

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील प्रवेशप्रक्रिया येत्या तीन-चार दिवसांत सुरू होणार आहे. बीए-एमए आणि बीकॉम-एमकॉम प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लवकरच लिंक खुली होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाकडून देण्यात आली.

विद्यापीठाच्या मुक्‍त अध्ययन प्रशालेअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने बहि:स्थ शिक्षण प्रणालीऐवजी दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठाने गेल्या दोन वर्षापूर्वी मुक्‍त अध्ययन प्रशाला स्थापन केली. त्याद्वारे बीए-बीकॉम, एमए आणि एमकॉम, एमबीए अभ्यासक्रम दूरशिक्षणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध देण्यात येत आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रातील प्रवेशप्रक्रिया 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबरपर्यंत राहील. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती मुक्‍त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी सांगितले.

यंदा करोनामुळे सर्व शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा स्थितीतही गतवर्षीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यापद्धतीने विद्यार्थ्यांना वेळेत अभ्यास साहित्य पुरविण्यात येत आहे. करोनामुळे यंदा अभ्यास साहित्य मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी “पीडीएफ’ स्वरुपात संबंधित केंद्र आणि विद्यार्थ्यांना इ-मेलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. अभ्यास साहित्य नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये, यासाठी मुक्‍त अध्ययन केंद्रमार्फत योग्य दक्षता घेण्यात येत असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले.

“करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुक्‍त अध्ययन प्रशालेअंतर्गत असणाऱ्या विविध अभ्यासक्रमास प्रवेशप्रक्रिया लांबली. मात्र आता मुक्‍त अध्ययन प्रशालेची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. करोनामुळे काही विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यांना दूरशिक्षण विभागातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी आहे.”
– डॉ. संजीव सोनवणे
अधिष्ठाता : आंतर विद्याशाखीय अभ्यास

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.