कृषी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया सुरू

पुणे – मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रसिद्ध केले. त्यानुसार येत्या 1 डिसेंबरपासून अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून येत्या 1 जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत.

राज्यातील महात्मा फुले राहुरी विद्यापीठांतर्गत 11, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलांतर्गत 9, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत 11 आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकणी कृषी विद्यापीठांतर्गत 7 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता 1 हजार 335 आहे.

कृषी शिक्षण परिषदेतर्फे एसईबीसी आरक्षणासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावा, असे परिषदेतर्फे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ही प्रवेशप्रक्रिया सुरू होत असून, प्रवेशाचे वेळापत्रक कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.