पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून (दि.29) सुरू होत आहे. बीए, बीकॉम, एमए आणि एमकॉम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 14 डिसेंबरपर्यंत आहे.
काही कारणांमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अथवा प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य नाही. त्यांना दूरशिक्षण अभ्यासक्रमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेअंतर्गत या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया दि. 29 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.
प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाने आज प्रसिद्ध केले असून, ते संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असून, त्यासाठी प्रथम नोंदणी करावे लागेल. अर्जाची मुदत 14 डिसेंबर, तर अर्ज सादर करण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत आहे. भरलेला अर्ज अभ्यास केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहिती http://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.