पोळे गावच्या सुरेखा ढेबेने मिळवले 86 टक्के गुण
खडकवासला – पानशेत परिसरातील पोळे गावची आदीवासी धनगर कुटुंबातील सुरेखा ढेबे हिने आपल्या खडतर परिस्थितीसह अठराविश्व दारिद्य्रावर मात करत 86.60 टक्के गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल तिच्यावर पानशेत परिसरातील नागरिकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुरेखा ढेबे ही आदीवासी धनगर कुटुंबातील कष्टाळू मुलगी आहे. आपल्या मुलांना शिक्षण मिळावे, म्हणून वडील रमेश ढेबे यांनी गाव सोडून पुणे गाठले.मिळेल ते काम करू लागले. मिळणाऱ्या चार पैशांतून मुलांना शाळेत धाडले. पण नियतीच्या मनात वेगळाच खेळ होता. एके दिवशी वडिल रमेश ढेबे कामावर जात असताना त्यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. त्यानंतर हे कुटुंब पुर्णच हतबल झाले. वडिल अंथरूणाला खिळून राहीले.
घर चालवायचे कसे? मुलांचा सांभाळ आणि शिक्षण करणे अवघड होऊन बसले. सुरेखाच्या आईवर घर चालवण्याची वेळ आली. आईच्या कामावर घर आणि शिक्षण खर्च भागवणे अवघड होते. वडिलांची तळमळ आणि आईची घालमेल पाहावत नसल्याने सुरेखा आईबरोबर घरकामे करू लागली. काम करत करत शाळा शिकत राहिली.
इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या वेळेत रात्रीचा दिवस करत अभ्यास केला आणि घरच्या परिस्थितीला मुठमाती देत बोर्डाच्या परीक्षेत 86.60 टक्के मिळवत यशाला गवासणी घातली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.