मुंबई – ‘कांतारा’ चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. अश्यातच, पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘कांतारा’ चित्रपट जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर’ 2023 साठी नामांकन म्हणून पाठवण्यात आला आहे.
मेकर्सचे म्हणणे आहे की, त्यांनी शेवटच्या क्षणी ऑस्कर 2023 च्या नामांकनासाठी ‘कांतारा’ हा चित्रपट पाठवला आहे. आपल्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळावे, जेणेकरून चित्रपटात दाखवलेला संदेश जागतिक स्तरावर ओळखला जावा, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.यापूर्वी, एसएस राजामौली यांचा बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी आधीच पाठवला गेला आहे. अश्यातच आता ‘कांतारा’ देखील या शर्यतीत सामील झाला आहे. जगभरात 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय या चित्रपटाने केला आहे.
दरम्यान, ‘कांतारा’चे कन्नड व्हर्जन आणि हिंदी व्हर्जन 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाले. तसेच, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा निर्मित, या चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर कुमार मुख्य भूमिकेत आहेत. ‘कांतारा’ प्रदर्शित झाल्यापासून जगभरात धुमाकूळ घालत आहे. याने आधुनिक काळात चित्रपटाच्या यशाची पातळी खऱ्या अर्थाने पुन्हा परिभाषित केली आहे.