मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सर्वात मोठी कारवाई करत अनेक बड्या बॉलीवूड सेलेब्सवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातनंतर एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला.
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली.
दरम्यान, उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.
ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावलेले विभागाचे प्रमुख समीर वानखेडे याचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्यासह राज्यातील ११ पोलिसांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. एनसीबीच्या देशभरातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये वानखेडे याचाही सन्मान करण्यात आला आहे.
ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे.