मुंबई – देशभरातील करोना साथीला रोखण्यासाठी अनेक पातळ्यांवर मदतकार्य सुरू आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार या मदतकार्यामध्ये सहभागी होत आहेत. मदत निधी उभारण्यासाठी कलाकारांनी 9 मे रोजी एक व्हर्च्युअल कॅम्पेन आयोजित केले आहे.
या कॅम्पेनमध्ये श्री श्री रविशंकर हे देखील असणार आहेत. त्यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, अनिल कपूर, शिखर धवन, करण जोहर, अभिषेक बच्चन, ऋषभ पंत, शेखर कपूर, कृति सेनन आणि अन्य कलाकारही सहभागी झाले आहेत.
उद्या संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत हे व्हर्च्युअल कॅम्पेन चालणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व कलाकार देणगीदारांना आवाहन करणार आहेत. या कॅम्पेनच्या माध्यमातून 10 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न असणार आहे.
सोनू सूद, जॅकलीन फर्नांडिस, कंगना राणावत, सलमान खान यांनी यापूर्वीच निधी संकलन आणि गरजवंतांना अन्न, ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे.