सोमेश्वरनगर – बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाल दि. १९ एप्रिल रोजी संपत असल्याने कारखान्यावर प्रशासकाची नेमणुक करावी, अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
काकडे यांनी सहकारमंत्री पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि सोमेश्वरनगर, ता.बारामती, जि.पुणे या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक मुदत दि. १९/४/२०२० रोजी संपुष्टात येत असल्याने कारखान्यावर तात्काळ प्रशासक नेमण्याकरीता साखर आयुक्त सो, व सहकार आयुक्त सो. यांना याबाबत आपले आदेश व्हावेत. राज्य सरकारने सर्व निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकलेल्या असल्यामुळे तसेच देशावर कोरोना संकटामुळे लवकर निडणुका होतील म्हणुन शंका आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाचा मागील इतिहास पाहिला असता संचालक मंडळाला अधिकार नसताना चुकीचे धोरणात्मक निर्णय घेवुन कारखाना आर्थिक संकटात आणला होता. तसेच विद्यमान संचालक मंडळावर कलम ८८ अंतर्गत सरकारने चौकशी लावली होती. म्हणुन पुन्हा ती चुक न होण्यासाठी संचालक मंडळाला कोणताही निर्णय घेण्यास मनाई करून संचालक मंडळाच्या गाड्या काढुन घेवुन स्वतंत्र अधिकारी किंवा कार्यकारी संचालक यांना प्रशासन म्हणुन नियुक्त करण्यात यावे व संचालक मंडळ बरखास्त करावे व योग्य ती कार्यवाही करावी. कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव मला मुंबई हायकोर्ट यांचेकडे दाद मागावी लागेल, असे सतीश काकडे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.