चिंबळी – चिंबळी (ता. खेड) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचपद रिक्त असल्याने ग्रामपंचायत कामकाजास अडचण निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या प्रस्तावा नुसार चिंबळी ग्रामपंचायतीवर खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एस. साळुंके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिंबळी ग्रामपंचायतीत पार पडलेल्या सरपंच, उपसरपंच निवडणूक कामकाजा विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांनी ही निवडणूक कामकाज रद्द केले होते.
या निकालाविरोधात संबंधित सरपंच, उपसरपंच यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.या अपीलावर सुनावणी पार पडली असून अतिरिक्त आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालावर स्थगिती न देता निर्णय राखून ठेवला आहे. यात पदे रिक्त असल्याने कामकाजास होणारी अडचण लक्षात जिल्हा परिषद प्रशासनाने चिंबळी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला आहे.