मावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रिया : 370 मतदान केंद्रांसाठी 2220 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती
वडगाव मावळ  – मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 370 मतदान केंद्र व 2 हजार 220 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
सोमवारी (दि. 21) रोजी होणाऱ्या विधानसभेसाठी मतदान प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवर मतदानासाठी वापरण्यात येणारे इव्हीएम व व्हीव्हीएम पॅट सीलबंद करून तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्च येथे स्ट्रॉंगरूममध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत.

रविवारी (दि. 20) सर्व मतदान केंद्रांवरील साहित्य याच ठिकाणावरून रवाना करण्यात येणार असून, मतदानानंतर पुन्हा याच ठिकाणी जमा करून “स्ट्रॉंगरूम’मध्ये ठेवण्यात येणार आहे. कर्मचारी व साहित्याच्या वाहतुकीसाठी 48 एस. टी. बस, 22 मिनी बस, 28 जीप तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी 40 जीप अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी याप्रमाणे एकूण 370 मतदान केंद्रांसाठी 2 हजार 220 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणही देण्यात आलेले असून, रविवारी (दि. 20) रोजी ते मतदानकेंद्रांवर रवाना होणार आहेत. दरम्यान गुरुवारी (दि. 24) रोजी मतमोजणी प्रक्रिया तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच होणार असून, सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.