पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभाग रचना रद्द केली आहे. त्याचबरोबर पालिका निवडणूक प्रक्रियाही राज्य सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक कधी होईल हे सध्या कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत पिंपरी महापालिकेवर आणखी तीन ते चार महिने प्रशासक राजवट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. प्रशासकीय राजवटीला पाच महिने होत आले आहेत. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त प्रशासकीय राजवट नसू नये, असा नियम आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने दि. 3 ऑगस्ट रोजी महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना आणि वाढलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या रद्द केली. त्यामुळे 2017 मध्ये झालेल्या चार सदस्यीय पध्दतीने महापालिका निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिका निवडणूक आणखी लांबणार असल्याचे दिसून येत आहे.