वसई विरार – वसई विरार महापालिकेवर आजपासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. 28 जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव, वसई विरार नालासोपारा शहरात दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती याचे नियोजन करताना प्रशासक गंगाथरण डी यांची कसोटी लागणार आहे.
115 सदस्य संख्येच्या वसई विरार महापालिकेत 109 नगरसेवक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. मात्र या महापालिकेचा गाडा पहिल्यांदाच प्रशासक हाकणार आहे.
गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेत आयुक्त आणि लोकप्रतिनिधीमध्ये खटके उडत होते. त्यामुळे प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी प्रशासनाला किती सहकार्य करणार, हा प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची नुकतीच बदली झाली होती. खुद्द मनाळे यांची विनंती आणि प्रशासकीय कारणावरुन बदली झाल्याची चर्चा आहे.