कात्रज – कोविड-19 आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिविर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या आहेत त्या तातडीने दूर कराव्यात ,अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने आज पत्रकार परिषदेत केली.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ. सुनील जगताप यांनी ही मागणी केली आहे. यावेळी डॉ. रवींद्रकुमार काटकर, डॉ. संभाजी करांडे, डॉ. आण्णासाहेब गरड, डॉ. नीरज जाधव आदी उपस्थित होते. जनरल प्रॅक्टिशनरला लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
डॉ. मांगडे म्हणाले की, पुण्यात अनेक कोविड उपचार केंद्रे सुरू झाली आहेत. प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण तपासत असताना व उपचार देत असताना हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स तसेच वैद्यकीय सेवक यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची कमतरता तसेच या आजारासाठी संजीवनी ठरत असलेल्या इंजेक्शन रेमडेसिविरची पुरेशी उपलब्धता नसणे, ही अडचण येत आहे.
प्रशासनाच्या सहकार्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा संपूर्ण होऊ शकत नाही. या गोष्टी असतील तरच डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना बरे करू शकतात. गेले 15 दिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. तसेच इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीत. या स्थितीत खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये येणारे रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत येतात, त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास नातेवाईक उपलब्ध बेडवर रुग्णांना ऍडमिट करून घ्या म्हणतात, अशा रुग्णांना शेवटपर्यंत ऑक्सिजन बेड मिळत नाही व रुग्ण दगावतो.
सर्व वैद्यकीय सेवकांची प्रशासनाला एकच विनंती आहे, आम्ही रुग्ण वाचविण्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होण्यास देखील तयार आहोत.
परंतु, रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्यांची अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. या समस्या प्रशासनाने लवकरात लवकर सोडवाव्यात, जेणेकरून डॉक्टरांवर व हॉस्पिटल्सवर आरोप होणार नाहीत, असे आवाहनही पत्रकार डॉक्टरांकडून करण्यात आले.
“एफडीए’कडून इंजेक्शन वितरणाची व्यवस्था कलेक्टर ऑफिसला जाण्याने अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. प्रशासनाशी संपर्क साधण्यात प्रचंड अडचण येत आहे, असेही सांगण्यात आले.