दखल : राजकीय साठमारीच्या बळी

-श्रीकांत नारायण

राजकीय डावपेचात प्रशासकीय अधिकारी अनेकवेळा बळी ठरल्याचे इतिहासात उदाहरणे आहेत. त्याचबरोबर राज्यपाल आणि नायब राज्यपाल ही घटनात्मक पदेही राजकारणाचा बळी ठरतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदी.

प. बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभा निवडणूक होत आहे. पुद्दुचेरीच्या एकूण 30 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होत आहे. विधानसभा निवडणूक घोषित होण्याआधीच पुद्दुचेरीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. एका मंत्र्यांसह सत्तारूढ कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षत्याग केल्यामुळे मुख्यमंत्री नारायण सामी यांचे कॉंग्रेस आघाडी सरकार अल्पमतात गेले आणि त्या सरकारला पायउतार व्हावे लागले.

विधानसभा निवडणूक होईपर्यंत या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली.
पक्षत्याग केलेले बहुतेकजण भाजपमध्ये जाणार असल्याने भाजपची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे आणि त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता असलेले दक्षिणेतील एकमेव राज्यही आता संपुष्टात आले आहे. मात्र राजकारणाच्या या साठमारीत पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल असलेल्या किरण बेदी यांचा मात्र हकनाक बळी गेला आहे. सत्तेच्या राजकारणाचा फटका चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला कसा बसतो, याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल.

वास्तविक पोलीस खात्यात कठोर प्रशासकीय सनदी अधिकारी म्हणून गाजलेल्या किरण बेदी या एकेकाळी भाजपमध्येच होत्या. मागे विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा पुढे करून दिल्लीत निवडणुका लढविल्या होत्या. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या स्वच्छ प्रतिमेपुढे किरण बेदी यांची डाळ शिजली नाही. त्या निवडणुकीत किरण बेदी यांच्यासह भाजपचा पराभव झाला. त्यानंतर लगेचच किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. सुमारे चार-साडेचार वर्षे बेदी यांनी तेथे आपल्या कठोर प्रशासनाचा कारभार केला. मात्र पुद्दुचेरीत कॉंग्रेस आघाडीचे सरकार असल्याने या सरकारने किरण बेदी यांना सतत विरोध केला. सरकारच्या कारभारात बेदी हस्तक्षेप करतात असा मुख्यमंत्री नारायण सामी यांच्यासह प्रमुख कॉंग्रेस नेते आणि आमदारांचा आरोप होता.

एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस त्याचे चांगले भांडवल करेल अशी भीती भाजप श्रेष्ठींना वाटली शिवाय कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये येणाऱ्या आमदारांचाही बेदींबद्दल तोच आक्षेप होता. त्यामुळे किरण बेदी यांना कसलीही पूर्वकल्पना न देता त्यांची रात्रीतून उचलबांगडी करण्यात आली आणि भाजपने कॉंग्रेसच्या प्रचारातील मुख्य हवाच काढून टाकली.
बिचाऱ्या किरण बेदी यांनी त्या रात्रीच ट्‌विट करून सर्वांचे आभार व्यक्‍त केले. राजभवन खाली केले आणि त्या दिल्लीला निघून गेल्या. किरण बेदी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्‍त केली नसली तरी त्यांच्या असंख्य चाहत्यांना चांगलाच धक्‍का बसला आहे. पक्षीय राजकारणामुळेच त्यांचा बळी गेला हे कोणीही मान्य करेल.

पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच असा निर्धार भाजपने केला असून त्यादृष्टीने कॉंग्रेस फोडाफोडीच्या राजकारणाला त्यांना यश मिळाले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यात पुद्दुचेरीचा दौरा केला होता परंतु त्यांची पाठ वळताच कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षत्याग केला आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार कोसळले. पुद्दुचेरी विधानसभेचे अध्यक्ष असलेले व्ही. पी. शिवकोलुंधू यांनाही भाजपने चुचकारले असून ते भाजपमध्ये येण्याची शक्‍यता आहे. त्यांचे बंधू व्ही. पी. रामलिंगम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या विधानसभा निवडणुकीत भाजप, एन.आर. कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुकबरोबर युती करून सर्व जागा लढविणार आहे. पाच कॉंग्रेस आमदारांनी पक्षत्याग केल्यामुळे दुबळी झालेली कॉंग्रेस गेल्यावेळेप्रमाणे याहीवेळेला द्रमुक बरोबर युती करून विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. मात्र द्रमुकने यावेळी आपली वेगळी चूल मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. द्रमुकचे नेते एस. जगतरक्षगण यांनी विधानसभेच्या सर्व 30 जागा द्रमुकतर्फे लढविल्या जातील अशी घोषणा केली आहे.

तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाला यावेळी बहुमत मिळेल अशी स्वप्ने द्रमुकला पडत आहेत त्यामुळे पुद्दुचेरीतही त्या पक्षाने वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेस एकाकी पडली आहे. द्रमुकबरोबर युती झालीच नाही तर कॉंग्रेसची अवस्था आणखी बिकट होणार आहे, यात शंका नाही.

भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी प्रमुख नेते प्रचाराला येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीचा मुकाबला कॉंग्रेस आणि द्रमुक हा मित्र पक्ष कशा प्रकारे करतात तेच आता पाहावे लागेल. सध्यातरी पुद्दुचेरीतले जनमत भाजपप्रणित आघाडीकडे झुकले असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत कदाचित त्याचेच प्रत्यंतर येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.