राजगुरूनगर : चाकण एमआयडीसीमधील वाघजाईनगर(खराबवाडी, ता. खेड) मधील पार्क्सन पॅकेजिंग लिमिटेड कंपनीतील काही कामगार करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत स्थानिकांच्या आणि कामगारांच्या आलेल्या तक्रारीवरून प्रशासकीय अधिकारी कंपनीत गेले असता त्यांना कंपनी व्यवस्थापनाने आरेरावी करीत बाहेर हकलून लावले.
या कंपनीत काम करणारे कामगार वाघजाईनगर ग्रामपंचायत हद्दीत राहत आहेत कंपनीत सुमारे हजार कामगार आहेत त्यापैकी जवळपास 13 कामगार करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर या कामगारांच्या कुटुंबातील 8-10 जण पॉझिटिव्ह सापडले असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असून कंपनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहे.
स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासनापासून करोना पॉझिटिव्ह कामगारांची माहिती लपविणाऱ्या पार्क्सन पॅकेजिंग लिमिटेडवर कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शेलार, ग्रामस्थ शशिकांत सावळे,रमेश शितोळे, अनिल चव्हाण, भरत बोडके यांनी खेड पंचायत समितीकडे निवेदनवारे मंगळवारी (दि. 11) केली आहे. दरम्यान, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांबाबत सुरक्षेसाठी कंपनीकडे वारंवार मागणी करूनही त्यांना आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्या नाहीत. तर आवाज उठवणाऱ्यांना कंपनीने घरी बसवत असल्याने कामगार आक्रमक झाले आहेत.
मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी करणार शिफारस
कंपनीतील कोविड व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे गेले असता कंपनी व्यवस्थापनाने अरेरावी करून बाहेर काढण्याचा प्रताप या कंपनीने केला आहे.
कामगार करोना पॉझिटिव्ह रुग्ण असताना कोणत्याही प्रकारची दखल न घेणाऱ्या या कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे राक्षे, जोशी यांनी सांगितले.