कोट्यवधींची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात; सभागृहातच उघड केले पुरावे
ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या बॅंक खात्यात लाच जमा
पिंपरी – ‘करोना’सारख्या महामारीमध्ये ठेकेदारांशी संगनमत करून महापालिका प्रशासनाने केलेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काढले. विशेष म्हणजे भाजपाच्या तुषार कामठे यांनी पुराव्यानिशी सभागृहातच प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे उघड केल्यामुळे सर्वजणच अवाक झाले. अधिकाऱ्यांनी थेट बॅंक खात्यावर ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप करत बॅंक खातीच आयुक्तांसह सभागृहासमोर ठेवल्यामुळे खळबळ उडाली. याप्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणाचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने करोनाच्या कालावधी कोट्यवधी रुपयांची थेट आणि हातचलाखीने कोटेशन पद्धतीने खरेदी केली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वैद्यकीय विभागासाठी साहित्य खरेदी केल्याचा विषय दैनिक “प्रभात’ने वारंवार उजेडात आणला होता. त्याचे पडसाद गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. दुपारी दोन वाजता सुरू झालेले सभेचे कामकाज रात्री पावणे दहा वाजेपर्यंत सुरू होते. या सभेमध्ये सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. यामध्ये भाजपाचे तुषार कामठे यांनी पुराव्यानिशी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उजेडात आणला. तर शिवसेनेच्या राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीच्या दत्ता साने यांनीही विविध खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. 1 एप्रिल रोजी कोरमअभावी तहकूब करण्यात आलेली सभा गुरुवारी पार पडली. सभेच्या समोर पाच विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या शेजारी असलेल्या गावांना मोफत दोन लाख मास्कचे वाटप महापालिकेने करावे, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली होती. या विषयावर खडाजंगी चर्चा झाली.
सुनील शेळके यांच्या नावासह विषय आणल्याचा आक्षेप राष्ट्रवादीकडून घेण्यात आला. तर भाजपाच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या नाना काटे व शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी कमी दर्जाचे मास्क दिल्याचा आरोप करत मास्कच्या खरेदीच्या चौकशीची मागणी केली. यावर आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची कमिटी नियुक्त करत चौकशीचे आश्वासन दिले.यानंतर भांडार विभागासाठी करोना निधी हे लेखाशीर्ष नव्याने निर्माण करण्याचा विषय सादर करण्यात आला होता. तसेच या लेखाशीर्षावर दहा कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्याचा विषय होता. या विषयाला मंजुरी देण्यापूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या खरेदीचे वाभाडे काढले.
शेकडो पानांचे पुरावे सभागृहात
तुषार कामठे व संदीप वाघेरे यांनी शेकडो पानांची कागदपत्रे पुराव्यासाठी सभागृहात आणली होती. ही कामे कोणाच्या आशिर्वादाने झाला असा प्रश्न विचारत कामठे यांनी बोलायला सुरुवात केली. गरज नसताना कोट्यवधी रुपयांची साहित्याची ज्या पद्धतीने खरेदी केली ती चुकीची असल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावेळी महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा खात्यावरील पुरावा सभागृहासमोर सादर केला. तर पन्नास लाख रुपयांचे मशीन दीड कोटी रुपयांना घेण्याचा पालिकेकडून सुरू असल्याचा आरोप केला.
आतापर्यंत घेतलेल्या अनेक मशिनरीचे स्पेसिफिकेशन बदलून महापालिकेची फसवणूक केल्यामुळे या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्यांचे निलंबन करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. सर्व पुरावेच त्यांनी हात वर करून सभागृहाला दाखविले. करोना कालावधीत काही ठराविक ठेकेदारांना कोट्यवधींची कामे देऊन पालिकेची लूट केल्याचाही आरोप त्यांनी केला. यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून लाच प्रकरणासह स्पेसिफिकेशन बदलण्यात आल्याच्या प्रकाराचा संपूर्ण तपास करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले. नगरसेवकांनी काढलेल्या या वाभाड्यामुळे पालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
ठेकेदाराने आयकर विवरणपत्रात दाखविली लाचेची रक्कम
आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेला एक अधिकारी आणि महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या मेडिकल इंजिनिअरच्या खात्यामध्ये ही लाचेची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. कामठे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून ही रक्कम वायसीएमला साहित्य पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदाराच्या खात्यातून गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आयकर विभागाला सादर केलेल्या वार्षिक विवरणपत्रामध्येही संबंधित अधिकाऱ्यांना ही रक्कम दिल्याचे सादर करण्यात आले आहे.
कागदपत्रांमध्ये खाडाखोड
नगरसेवक म्हणून कागदपत्रांची माहिती कामठे यांनी मागविली होती. ही माहिती देताना संबंधित विभागातील एका लिपिकाने अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या रक्कमांची खाडाखोड करून कामठे यांना कागदपत्रे दिली. या कागदपत्रांवर खाडाखोड करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असून अशी खाडाखोड करून कागदपत्रे देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी कामठे यांनी यावेळी केली.