– विनोद पोळ
कवठे – भुईंज पोलीस स्टेशन व वाई तालुका महसूल प्रशासन यांचेकडून ओझर्डे पंचक्रोशीतील व वाई तालुक्यातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे. मौजे ओझर्डे येथील भारतीय सैन्य दलातील जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथे कार्यरत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले असून शहीद जवान तांगडे यांचे पार्थिव दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे मूळ गावी ओझर्डे येथे आणण्यात येणार आहे. ओझर्डे ग्रामस्थांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री ७:३० च्या सुमारास तांगडे यांचे पार्थिव सिक्कीम येथू विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे.
तदनंतर पुण्याहून पार्थिव त्यांच्या गावी ओझर्डे येथे आणण्यात येणार असून याच दिवशी रात्री अंदाजे १०: ३० वाजणेच्या दरम्यान तांगडे यांच्यावर ओझर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, मा. गट विकास अधिकारी वाई, मा.तहसीलदार सो वाई, मा.सहा.पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस स्टेशन यांनी सध्यस्थितीत कोरोनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी कोविड- १९ चे संदर्भात निर्गमित केलेल्या आदेशानुसार कोणत्याही अंत्यविधी करिता वीस पेक्षा अधिक लोक उपस्थित राहू शकत नाहीत.
तांगडे हे देशासाठी वीरगतीस प्राप्त झाले असल्यामुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तरी जिल्हाधिका-यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंत्यविधी व पार्थिवाचे दर्शनाकरिता कोणीही गर्दी करू नये. आपण सर्वांनी लांबूनच तांगडे यांना श्रद्धांजली अर्पण करावी. कोविड -१९ च्या अनुषंगाने आपण गर्दी न करता लांबूनच तांगडे यांना दिलेली श्रद्धांजली महत्वाची ठरणार आहे. तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सर्वांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे अशी प्रशासनाच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात आलेली आहे.