आकाशचिन्ह परवाना विभागाने नोटीस पाठवल्याच नाहीत : आयुक्तांचे आदेश गुंडाळले
पुणे – रस्त्यावर अनधिकृतरित्या लावलेले फ्लेक्स आणि बॅनरवर बेधडक कारवाई करण्याचे आदेश खुद्द महापालिका आयुक्तांनी दिले असतानाही, खात्यानेच त्यावर अंमलबजावणी करण्याला टाळाटाळ सुरू केली आहे. यामध्ये आकाशचिन्ह परवाना विभाग आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाचा समावेश असून, ते जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याने त्यात चालढकल केली जात आहे.
अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्सवरील कारवाई सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी महिन्यापूर्वीच दिले होते. त्यावेळी केवळ दीडशेच्या आसपासच बॅनर्स, फ्लेक्स असतील असे उत्तर देण्यात आले होते. हे बॅनर्स लाखोंच्या संख्येने असतील असे स्वत: आयुक्तांनीच सांगितले होते. असे असताना एकही बॅनरे, फ्लेक्सवर कारवाई केली गेली नाही.
वास्तविक या कारवाईसाठी आकाशचिन्ह विभागाने संबंधितांना नोटीसा देणे भाग होते. त्यानुसार त्यावर अतिक्रमण नियंत्रण विभाग कारवाई करतो. प्रत्यक्षात या नोटीसाच गेल्या नाहीत. याचे स्पष्ट कारण त्यांनाही देता येत नसून, “आयुक्तांशी बैठक होणार आहे’ एवढेच कारण पुढे केले जात आहे.
यामध्ये नोटीस देण्याची जबाबदारी ही आकाशचिन्ह परवाना विभागाची आहे. त्यांनी नोटीस दिल्यानंतर आम्ही त्या बॅनर्स, फ्लेक्सवर कारवाई करू, मात्र त्यांच्याकडून नोटीसच आम्हांला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या फ्लेक्स, बॅनरवर कारवाई करावी, हा देखील प्रश्न आहे.
– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण विभाग