खासगी डॉक्टरांना पुढे येण्याचे आवाहन – आमदार दिलीप मोहिते
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. तर जनतेने कडक जनता कर्फ्यू पाळावा. सर्वच यंत्रणेवरील ताण वाढला असून करोनावर मात करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांनी पुढे यावे असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी अधिकारी बैठकीत केले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1324226127917089/
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. तो रोखण्याचा आतापर्यंत अपयश आले आहे. तालुक्यात 4274 करोना बाधित झाल्या 95 व्यक्तीचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असून यावर मात करण्यासाठी गुरूवारी (दि. 10) तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीला आमदार दिलीप मोहिते यांच्यासह प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. माधव कणकवले, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मुंढे, राजगुरूनगर, चाकण, आळंदी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी, तीनही पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह खासगी हॉस्पिटलचे डॉ. शेखर घुमटकर, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. प्रमिला बांबळे, डॉ. शीतल पवार, डॉ. शिवाजी गायकवाड, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, बॅंकेचे अधिकारी विकास भास्कर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, अनेक अधिकारी काम करीत नाहीत. पाहिजे ती मदत मिळेल मात्र बाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी झाले पाहिजे. चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर शहरात नगर परिषद हद्दीत रुग्णाची संख्या जास्त आहे. मुख्याधिकारी काम करीत नाहीत त्यांनी करोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी.
“खासगी रुग्णालयात करोना अँटीजेन टेस्ट केल्यास त्यांनी बाधित रुग्णावर उपचार करण्याची व्यवस्था करावी. उपचार करणार असतील तर परवानगी दिली जाईल.
-डॉ. दीपक मुंढे, चांडोली ग्रामीण रुग्णालय
प्रांताधिकारी संजय तेली म्हणाले, तालुक्यात करोना विषाणू रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात करोना रुग्णांवर कोविड केअर आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात सुरु केलेल्या ऑक्सिजन बेड रुग्णसेवेसाठी डॉ. प्रदीप शेवाळे, डॉ. योगेश मंदीलकर, डॉ. ओंकार काजळे यांची नियुक्ती केली आहे. याबरोबरच 30 डॉक्टरांना अधिग्रहित केले आहे. आतापर्यंत त्यांची गरज लागली नाही; मात्र पुढे लागणार आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी तात्काळ रजिस्ट्रेशन करावे. त्याचा मोबदला शासनाकडून दिला जाणार आहे. केवळ 6 तास काम करता येणार आहे.
यावेळी डॉ. शेखर घुमटकर, डॉ. शिवाजी गायकवाड यांनी खासगी डॉक्टरांची बाजू मांडली.