प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा पुरवावी

आमदार दत्तात्रय भरणे : पालखी प्रस्थानानंतर आरोग्य विभागाने स्वच्छता करावी

रेडा -सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीतून वारकरी लाखोंच्या संख्येने जातात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तसेच संत सोपानदेव पालखी सोहळा व संतराज महाराज पालखी तसेच विविध संतांच्या पालख्यातील वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवावी, नागरिकांनी देखील वारकऱ्यांना सेवा द्यावी व सर्व सुखसुविधा पुरवाव्यात, असे आदेश आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.

निमगाव केतकीत तयारीकडे पाठ
इंदापूर पंचायत समितीसह तालुक्‍यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आराखडे वाचून दाखवले. भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शाब्दिक हल्ला चढवला. संत सोपान काका पालखी मार्गावर जी दुरुस्ती सुरू आहे. त्याचे काम निकृष्ट सुरू आहेत. त्यामुळे पालखी रथ आला की धोका होण्याची शक्‍यता नागरिकांनी वर्तवली आहे. निमगाव केतकी येथील संत तुकोबारायांच्या पालखी मुक्‍कामाची तयारी प्रशासनाने अद्याप केली नाही. पालखी स्थळावर मुख्य पालखी चौथऱ्यावर पत्रे बदलले नाहीत, अशा तक्रारी बैठकीत तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी केल्या. 

इंदापूर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार (दि. 28) आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पंचायत समितीच्या सभाग्रहात पार पडली. त्यावेळी भरणे बोलत होते. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जीवन माने, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अधिकारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीत मुक्‍कामासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व इतर संतांच्या पालख्या येत असतात. यातील सर्व भक्‍तांची गैरसोय होता कामा नये, अशी सूचना त्यांनी केली. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्‍टर राजेश मोरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाईची मागणी भरणे यांच्याकडे केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.