पुणे – पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांसाठी दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या तयारीमध्ये प्रशासन व्यस्त आहे. मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी वेळोवेळी आढावा घेत आहेत. पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होत आहे. तर शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघाची बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे. या दोन्ही ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयोगाने नेमलेले अधिकारी मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणांची पाहणी करत आहेत. सोमवारी शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे व मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.