Pune Ganesh Visarjan : गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग यात मिरवणुकीत असणार आहे. यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त असणार आहे.
लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूका निघणार असून मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर व उपनगरात मिळून साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.
नागरिकांसाठी मदत केंद्र
गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे, तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक आज दुपारी 4 वाजता निघणार आहे. उमांगमलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तसंच या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
या रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरुही असेल. तर कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखवण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर तो तोललेला असून, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आलेत. तर रथावर 23 नंदींचे चेहरे बसवले आहेत. दगडूशेठ गणेशोत्सवाचं यंदा 132वं वर्ष आहे.
मुंबईत कसे असणार नियोजन?
गणेश विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालीय. शांततेत विसर्जन होण्यासाठी जवळपास 12 हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज झालेत. गणरायाचं विसर्जन सुलभ आणि शांततेत व्हावे यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष, नैसर्गिक आणि 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे.