पूरस्थिती हाताळण्यास प्रशासन “फेल’

मुख्यसभेत नगरसेवकांची आगपाखड


नाल्यांवरील बांधकामही चर्चेत

पुणे – नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यसभेत प्रशासनावर आगपाखड केली. 25 सप्टेंबरच्या पूरस्थितीला प्रशासनालाच जबाबदार धरून, प्रशासन ही परिस्थिती हाताळण्यात “फेल’ झाल्याचा आरोपही केला.

भाजपच्या नगरसेविका राणी भोसले यांनी हा विषय प्रथम मांडला. यावर उपाययोजनांसंदर्भात कोणता आराखडा तयार केला आहे त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत मुख्यसभेपुढे सादर करण्याचे आदेश उपमहापौर तथा सभापती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले.

तर, अरण्येश्‍वराजवळ पूल आहे त्याचीही माहिती घ्यावी. याच भागात ओढ्यामध्ये क्रीडासंकुल बांधले आहे. ते पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 15 दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणीही झाली नाही. दरवर्षी 200 कोटी रुपये महापालिके कडून अशा कामांवर अक्षरश: उधळले जातात. मात्र त्या पैशांचा उपयोग सकारात्मक विकासासाठी केला जात नाही, असे सुभाष जगताप म्हणाले.

महापालिकेला विविध योजनांमधून घरे मिळाली आहेत. त्यातील घरे या नागरिकांना राहण्यासाठी दिली जात नाहीत. राज्यसरकारनेही यामध्ये लक्ष घातले पाहिजे, सगळी जबाबदारी नगरसेवकांवर टाकणे योग्य नाही. आयुक्तांनी या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी स्वत: जबाबदारी घेऊन पाठपुरावा केला पाहिजे, असे दीपक मानकर म्हणाले.

तर, यावेळी गफूर पठाण, दत्ता धनकवडे, महेश वाबळे, भैय्यासाहेब जाधव, राजश्री शिळीमकर, नाना भानगिरे, मनिषा कदम, सचिन दोडके, सुशील मेंगडे, प्रकाश कदम, आरती कोंढरे, हरिदास चरवड, प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, योगेश ससाणे, मंजुषा नागपुरे, शीतल सावंत, अश्‍विनी कदम यांचीही भाषणे झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.