अट्टल घरफोड्या जेरबंद

लोणावळा – गणपती प्रतिष्ठापनेच्या आदल्या रात्री भांगरवाडी विभागात एका बंद फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांपैकी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेल्या एका अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश मिळाले आहे.

सुजित शेळके असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपती प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी भांगरवाडी, लोणावळा मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एका बंद फ्लॅटमध्ये चोर शिरले असल्याचा फोन लोणावळा पोलिसांना आला होता. त्यावेळी रात्र गस्तीवर असणारे पोलीस सहा ते सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान चोरट्यांना गाडीच्या आवाजाची चाहूल लागली व त्यांनी तेथून पळ काढला.

चोरटे पळून जात असता पोलिसांच्या दृष्टीस पडले. पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग केला. त्यात एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले, परंतु दुसरा चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला होता. जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आकाश बाळू ननावरे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे होते, तर पळून गेलेल्या सुजित शेळके असे होते. हे दोघेही “रेकॉर्ड’वरील घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार असून, ननावरे यांच्याविरोधात 12 ते 13 गुन्हे दाखल आहेत. तर सुजित शेळके हा मोक्कामधील आरोपी असल्याची माहिती मिळत आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या मदतीने फरार आरोपी सुजित शेळके याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाणयाचे नाईक वैभव सुरवसे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.