आता आदित्यचा अडथळा!

दोन्ही कॉंग्रेसचा आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास विरोध

मुंबई : शिवसेना – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या सत्तास्थापनेचा मुहुर्त लवकर येण्याची शक्‍यता धुसरच दिसतेय. कॉंग्रेस कार्यकारिणीची मान्यता मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युवराज आदीत्य यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आहे. त्याला दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोध व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितले. त्याला शिवसेनेने मान्यता दिली. त्यानंतर दोन्ही कॉंग्रेसने उध्दव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी जाहीररित्या दाखवली. दरम्यान कॉंग्रेसमधील उच्चपदस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार स्थापनेला उशीर हा कॉंग्रेसमुळे होत नसून शरद पवार हे त्याला कारंणीभूत आहेत. कारण त्यांचा शिवसेनेनच्या राजकीय भूमिकेवर अजिबात विश्‍वास नाही. त्यामुळेच त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी त्या विषयावर चर्चा केली नाही. हे पवार यांनी सांगितलेले विधान खरे होते.

आदित्य यांच्या नेतृत्वाबरोबरच मंत्रीपदांच्या वाटपाचा निर्णयही या चर्चेत अडथळा ठरत आहे. गृह, अर्थ, महसूल आणि सहकार या खात्यांसाठी चर्चेत जोरदार रस्सीखेच होत आहे. मात्र सुत्रांच्या मते, गृह आणि महसूल ही खाती कॉंग्रेसला तर अर्थ आणि सहकार ही खाती राष्ट्रवादीला सुटण्याची शक्‍यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्याआधी किमान समान कार्यक्रम मंजूर करावा अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या दृष्टीने सहकार खात्याला अतिषय महत्व असून त्यासाठी राष्ट्रवादी ते आपल्याकडे ठेवेल, असे मानले जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकारिणीची (सीडब्लूसी) दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला मान्यता देण्यात आली. या बैठकीमध्ये कॉंग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, ए के अँटोनी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा केली जाऊ शकते.

दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये बुधवारी तब्बल 5 तास चर्चा झाली. मध्यरात्री ही बैठक संपली. त्यानंतर, शिवसेनेबरोबर समान कार्यक्रमाबाबत फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.