मुंबई : आज उबाठा पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील टीका केली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे.
आता फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वॉशिंग मशीन सरकार नाही.