मुंबई : राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले कोकणातील राजन साळवी यांनी देखील ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता ऑपरेशन टायगरची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सूतोवाच केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर संजय शिरसाठ यांनी जोरदार टीका केली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे कधीपासून नेते झाले? खासदारांनी स्नेहभोजनाला परवानगी घेऊन जावे, असे वक्तव्य करुन आदित्य ठाकरे राजकारण करत असतील तर तो लाचारीचा कळस आहे. त्यांनी मातोश्रीची इज्जत घालवली, आमचे चुकले हे सांगायचे धाडस लागते. ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे, आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असं संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितलं.
आता वाघांच्या कळपात या भास्कर जाधवांना ऑफर
आमदार भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवलं होतं. याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ काय? हे तुम्ही समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, हे त्यांना सांगायचं आहे हे भास्कर जाधव म्हणतात मी नाही. त्यामुळे भास्कर जाधवांची मानसिकता झाली आहे की त्यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे.
याबाबत त्यांनी अनेकदा सुचवलं आहे. मात्र, त्यांना काही लोक विनवण्या करत आहेत. त्या लोकांचं भास्कर जाधव ऐकणार नाहीत, असं संजय शिरसाट म्हणाले. पुढे म्हणाले, भास्कर जाधव यांच्यासारखा चांगला आमदार म्हणजे ते अभ्यासू आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.