आदित्य, नईशा यांना विजेतेपद

पुणे: सोलारीस क्‍लब तर्फे पाचवी फाईव्ह स्टार जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या सबज्युनिअर गटात (15 वर्षाखालील) रिया पाठक हिने मानांकित खेळाडूचा पराभव करून स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविला. पुरुषांच्या गटात साई बगाटे आणि सुयोग पाटील यांनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला.

सोलारीस क्‍लबच्या मयूर कॉलनी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या गटात द्वितीय गटात आदित्य सामंत याने बिगर मानांकित श्रेयस माणकेश्‍वर याचा 11-8, 5-11, 15-13, 14-12 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. आदित्य हा डॉ.शामराव कलमाडी हायस्कूल शाळेत चौथी इयत्तेमध्ये शिकत असून हे आदित्यचे या गटातील पहिले-वहिले विजेतेपद ठरले.

10 वर्षाखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित नईशा रेवासकर हिने आपल्या मानांकनाला साजेशी खेळी करताना तनया अभ्यंकर हिचा 9-11, 11-4, 11-5, 11-4 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. नईशा ही व्हिबग्योर हायस्कूल शाळेत तिसरी इयत्तेमध्ये शिकत असून तिचे या मौसमातील तिसरे तसेच या गटातीलही तिसरे विजेतेपद ठरले.

पुरुषांच्या एकेरीच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित साई बगाटे याने सहाव्या मानांकित दिपक कदम याचा 11-9, 11-8, 11-9, 11-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. याबरोबरच सातव्या मानांकित सुयोग पाटील याने दुसऱ्या मानांकित वैभव दहीभाते याचा 11-9, 11-9, 8-11, 7-11, 11-9, 11-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

Leave A Reply

Your email address will not be published.