आदित्य बिर्ला सन लाइफ स्पेशल ऍपॉर्च्युनिटीज फंड

चतुर

अडचणीच्या काळातही संधी
अनिश्‍चिततेच्या काळात काही कारणामुळे चांगल्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीवरही परिणाम होतो. सध्या लॉकडाऊनमुळे आपण अशाच परिस्थितीतून जात आहोत. मात्र, अशा स्थितीतही बाजारातील वैशिष्ट्यपूर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी शेअरबाजारांनी विशेष संधी उपलब्ध करून दिलेली असते. अशा संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांनी करून घेण्याची गरज आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी नवी म्युच्युअल फंड योजना आणली आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ स्पेशल ऍपॉर्च्युनिटीज (एबीएसओ) फंड या नावाने ही योजना ओळखली जाणार आहे. आजपर्यंत (दि. 19 ऑक्‍टोबर) या योजनेत न्यू फंड ऑफरद्वारे गुंतवणूक करता येईल. त्यानंतर ही ओपन एंडेड म्हणजे कायम खुली असणारी ही योजना म्हणून कार्यरत राहील.
गुंतवणुकीतील खास संधी या संकल्पनेवर आधारित हा फंड काम करणार आहे.

विशिष्ट खास परिस्थितीमुळे फायदा होऊ शकतो अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विशिष्ट खास परिस्थिती म्हणजे सरकारची धोरणे, नियमातील बदल, कंपन्यांची संभाव्य विलीनीकरणे अशा विविध गोष्टींचा विचार करून या फंडाकडून गुंतवणूक केली जाणार आहे. विशिष्ट खास परिस्थिती या वर्गवारीत येणाऱ्या कंपन्यांचे शेअर ज्या किमतील उपलब्ध असतात त्यातून त्यांची खरी क्षमता किंवा मोल उघड झालेले नसते. फंड मॅनेजर ही संधी हेरून त्या कंपनीचे शेअर खरेदी करतात आणि शेअरचे खरे मूल्यबाजारात मिळेपर्यंत वाट पाहतात किंवा फंड मॅनेजरना अपेक्षित घटना घडल्यावर शेअरची किंमत वाढू लागते.

आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमणियन यांच्या सांगण्यानुसार अनिश्‍चिततेच्या काळात काही ना काही कारणामुळे अगदी चांगल्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीवरही परिणाम होतो. अभूतपूर्व अशा नैसर्गिक स्थितीमुळे आपण सध्यादेखील बाजारातील विशेष परिस्थितीतून जात आहोत. अशा स्थितीत बाजारातील वैशिष्ट्य्‌पूर्ण शेअर खरेदी करणाऱ्यांसाठी बाजाराने विशेष संधी उपलब्ध करून दिलेली असते. सध्याच्या काळातील नव्याने उदयास येत असलेले ट्रेंड, सध्याची व्यवसायाची पद्धती आणि त्यात होत असणारी उत्क्रांती आणि अनेक क्षेत्रांमध्ये होत असलेले एकीकरण अशा रूपांमध्ये या विशेष संधी उपलब्ध आहेत.

हे सर्व लक्षात घेऊन विशेष परिस्थितीच्या निकषाअंतर्गत म्युच्युअल फंड योजना ज्या शेअरचे वास्तविक मूल्य बाजारात उघड झालेले नसते अशा कंपन्यांचे शेअर घेतात. असे शेअर अनेकदा तळ गाठलेल्या स्थितीत उपलब्ध असतात.

अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याने यापूर्वीच्या अशा योजनांच्या कामगिरीच्या नोंदी उपलब्ध नाहीत. एबीएसओ हा संकल्पनेवर आधारित फंड असल्याने नेहमीच्या इक्विटी योजनेपेक्षा जास्त जोखीम आहे. त्याचबरोबर फंड मॅनेजर कशा पद्धतीने कंपनीसाठीची विशेष परिस्थिती शोधणार यावरही अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. उदाहरणार्थ, फंड मॅनेजरने निवडलेली कंपनी बॅंकिंग क्षेत्रातील असेल आणि बॅंकिंग नियमनातील सुधारणा पुढच्या पातळीवर जाणार असतील तर याबाबतची सरकारची धोरणे अनेकदा अनिश्‍चित असतात.

नेहमीच्या इक्विटी फंडाच्या तुलनेत संकल्पनेवर आधारित योजनांच्या विचारार्थ कमी कंपन्या असतात. उगाच अनुकूल नसणाऱ्या कंपन्यांवर लक्ष एकाग्र करणे हिताचे ठरत नाही. एबीएसओ योजनेच्या खात्यात 35 ते 40 कंपन्यांचे शेअर असतील. याचाच अर्थ या योजनेत चांगल्या प्रकारे बहुविविधता असणार आहे. परंतु खात्यातील आघाडीच्या काही कंपन्यांवरच लक्ष असेल. या कंपन्या ठराविक काळात चांगला परतावा देणाऱ्या असू शकतात.

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीने अशाच प्रकारचा फंड स्पेशल सिच्युएशन्स फंड नावाने 2008 मध्ये बाजारात आणला होता. नंतर सेबीच्या वर्गवारीच्या प्रक्रियेत मे 2018 मध्ये तो आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी फंडात विलीन करण्यात आला. त्या एकूण काळात या फंडाने 9.6 टक्‍के परतावा दिला होता. या सगळ्यांचा विचार करून गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.