पिंपरी -रहाटणी येथील आदित्य बुक्की याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. तर थेरगावातील अब्दुल अहम शेख याने 125 किलो गटात मास रेसलिंगमध्ये प्रथम व बेल्ट रेसलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा 28 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान अझरबैजान देशातील गोयगोल येथे पार पडल्या.
अझरबैजान सरकार क्रीडा मंत्रालय व वर्ल्ड एथनोस्पोर्टस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्याने शहरातील या दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदित्य बुक्की हा इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स या महाविद्यालयात शिकत असून त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इंदिरा कॉलेजच्या प्रमुख तरिता शंकर, अध्यक्ष चेतन वाकलकर, प्राचार्य जनार्दन पवार, उपप्राचार्य शेवेंदु भूषण, विभागप्रमुख थॉमसन वर्गीस, खेळाचे प्रमुख किशोर पठारे आदींनी सहकार्य केले. दरम्यान, आदित्यने यापूर्वी तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. तसेच राष्ट्रीय स्तरावर मागील तीन वर्षांपासून आपल्या वजन गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
अब्दुल शेख हा डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्समध्ये बारावीत शिकत असून त्याला किशोर नखाते, रंजीत कलाटे, कैलास बारणे, अभिषेक बारणे, तानाजे बारणे, नाना काटे आदींनी सहकार्य केले. अब्दुल याने यापूर्वी एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असून गेली तीन वर्षे त्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे.