टोकियो – भारताची गोल्फपटू आदिती अशोकचे ऑलिम्पिक स्पर्धांतील ऐतिहासिक पदक अवघ्या एका स्थानाने हुकले. तिसऱ्या फेरीपर्यंत दुसरे स्थान कायम राखणाऱ्या आदितीला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक गोल्फमधील पहिलेवहिले पदक जिंकवून देण्याचे 23 वर्षीय आदितीचे स्वप्न अधुरेच राहिले.
अटीतटीच्या या स्पर्धेत चौथ्या फेरीच्या 16 होल्सनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर होती. याच वेळी खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी 70 होल्सचा खेळ झाला होता. आदितीची तिसऱ्या स्थानासाठी लायडिआ कोसोबत बरोबरी झाली होती.
मात्र, पुढच्या दोन होल्समध्ये लायडिआने आघाडी घेतली आणि आदिती चौथ्या स्थानावर घसरली. दोन बोगीमुळे ती मागे पडली. 72 होल्सचा खेळ संपल्यानंतर आदिती 68 दोषांकांसह चौथ्या स्थानी राहिल्यामुळे तिचे पदक हुकले. रौप्यपदकासाठी इनामी आणि लायडिआ यांच्यात प्ले-ऑफ खेळवण्यात आले, ज्यात इनामीने बाजी मारली.
जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानी असलेली आदिती यंदा दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांत खेळत होती. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पणात आदिती 41 व्या स्थानी राहिली होती. यंदा मात्र तिने उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्णपदक पटकावले. जपानच्या मोने इनामीला रौप्य आणि न्यूझीलंडच्या लायडिआ कोला कांस्यपदक जिंकण्यात यश आले.
मला वाटते की, मी 100 टक्के प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी मोठी चुरस झाली. अन्य कोणत्या स्पर्धेत चौथे स्थान मिळाले असते, तर आनंद झाला असता. पण ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणे थोडेसे दुखःद आहे. मी चांगला खेळ केला आणि 100 टक्के दिल्याचे समाधान आहे.
– आदिती अशोक
अदिती उत्कृष्ट खेळली. टोकियो 2020 मध्ये आपण उत्तम कौशल्य आणि निर्धार दाखवला. आपण थोड्या फरकाने पदक गमावले, परंतु कोणत्याही भारतीयाने आतापर्यंत जे साध्य केले त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक उदाहरण ठेवले आहे. भविष्यासाठी शुभेच्छा.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान